लठ्ठपणाबाबत जनाजगृती; राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरू करणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:43 AM2018-10-12T01:43:05+5:302018-10-12T01:43:17+5:30
लठ्ठपणा हा आजार आहे, हेच आपल्याकडे अनेकांना माहीत नव्हते. याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करून विशेषत: लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना हाती घेतल्या जातील.
मुंबई : लठ्ठपणा हा आजार आहे, हेच आपल्याकडे अनेकांना माहीत नव्हते. याविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करून विशेषत: लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत सरकारी पातळीवर तातडीने उपाययोजना हाती घेतल्या जातील. तसेच राज्यात मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
राजभवन येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लठ्ठपणासंदर्भात एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेटाबॉलिक इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. लठ्ठपणाबद्दल वैज्ञानिक महत्त्व पटवून दिल्यास लोकांना त्वरित याबाबतची गंभीरता समजेल. लठ्ठपणाबाबतच्या लढ्याशी जे विविध प्रयत्न केले जातील त्यास सरकार सहकार्य करेल. मोठमोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी यायला हव्यात. त्यातून काय खावे हे समजेल. जंक फूडबाबतही समाजात जागृती होण्यासाठी शासनस्तरावर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या पुस्तक प्रकाशनानंतर राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले की, लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान आहे. लठ्ठपणा हा अनेकदा चेष्टेचा विषय ठरतो. लठ्ठ व्यक्तीच्या मनात त्यातून कमीपणाची भावना निर्माण होते. लठ्ठपणामुळे शहरी भागात मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे युवा वर्गाचे फार मोठे नुकसान होईल.