थक्क करणारा राजकीय प्रवास!

By admin | Published: December 5, 2014 09:48 PM2014-12-05T21:48:40+5:302014-12-05T23:17:08+5:30

नगरसेवक ते राज्यमंत्री : दीपक केसरकरांच्या निवडीने सिंधुदुर्गात जल्लोष

Awesome State Travel! | थक्क करणारा राजकीय प्रवास!

थक्क करणारा राजकीय प्रवास!

Next

अनंत जाधव- सावंतवाडी -नगरसेवक ते राज्यमंत्री असा प्रवास करत दीपक केसरकर यांनी नगरपालिकेतून थेट मंत्रालयात झेप घेतली आहे. त्यांच्या या कारकिर्दीत त्यांना अनेक चढउतार सहन करावे लागले. पण या सर्वाचा शेवट गोड झाला असेच म्हणावे लागेल. कारण राष्ट्रवादी काँॅग्रेसने त्यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवले आणि माळ उदय सामंताच्या गळ्यात घातली होती. त्याचवेळी केसरकरांनी मंत्रिपद मिळवणारच, असा ठाम निश्चय मनाशी बाळगला होता.
दरम्यान, केसरकर यांनी शुक्रवारी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आणि शिवसैनिकांनी सिंधुदुर्गात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला.
दीपक केसरकर हे राजकारणात येतील असे कोणतेही पाठबळ कुटुंबात नाही की, कुटुंबातील कोणी राजकारणात नाही. वडिल व्यवसाय करीत तर दीपक केसरकर त्यांना व्यवसायात मदत करत असत. १९८३ ते ८४ च्या काळात प्रथमच दीपक केसरकर हे रोटरी क्लब अध्यक्ष म्हणून समाजकारणात आले आणि त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला. रोटरी अध्यक्ष असताना त्यांनी बोटींग प्रकल्प मोती तलावात सुरू करून सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वळवले. पण त्यांनी स्वप्नातही कधी राजकारणात येणार असे ठरवले नव्हते.
याच काळात तत्कालीन सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळ टोपले यांना बदलण्याची वेळ आली. तेव्हा काँग्रेसकडे तालुकाध्यक्ष पदासाठी पर्यायी उमेदवार कोणी नव्हता. म्हणून अनेकांनी केसरकर यांनीच तालुकाध्यक्ष व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, केसरकर हे तालुकाध्यक्ष होण्यास इच्छुक नव्हते. त्यावेळी सावंतवाडीतील अनेक काँॅग्रेस नेते अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, राजू मसूरकर, तसेच शिवाजी सावंत यांनी दीपक केसरकर यांचे वडिल वसंतशेठ केसरकर यांच्याकडे विनवणी केली, पण ते ऐकण्यास तयार नव्हते. याच वेळी तत्कालीन राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केसरकर यांनी राजकारणात यावे, यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या गळ््यात तालुकाध्यक्षपदाची माळ घातली गेली.
आणि तेव्हाच केसरकरांचे राजकारणांचे इंजिन रूळावर धावू लागले. ते कधीही मागे वळून न पाहण्यासाठी. १९९७ च्या सुमारास केसरकर हे पहिल्यांदा स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेत आले आणि नंतर अल्पवधीतच ते नगराध्यक्ष झाले. मात्र, त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने जाहीर सत्कार केला. हा त्यांच्यावर ठपका ठेवत त्यांना पक्षातून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी केसरकर हे राजकीयदृष्ट्या काहीसे अडचणीत आले होते.
१९९९ साली याच मोक्याच्याक्षणी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँॅग्रेसची स्थापना केली आणि केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली. पुन्हा त्यांच्या राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू झाली. याचकाळात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लागली होती. सावंतवाडी मतदारसंघातून प्रवीण भोसले यांना पक्षाने तिकीट दिले होते. पण काँग्रेसची मते विभागणी झाली आणि सावंतवाडीतून शिवसेनेचे शिवराम दळवी हे विजयी झाले. इथूनच प्रवीण भोसले आणि दीपक केसरकर यांच्यात राजकीय शीतयुद्ध सुरू झाले. आगामी निवडणुकीत आपणास विधानसभेचे तिकीट मिळावे, यासाठी लॉबिग सुरू झाले. २००४ मध्ये केसरकर यांच्यावर मात करत प्रवीण भोसले यांनीच तिकीट मिळाले खरे, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश दळवी यांनी बंडखोरी केल्याने अखेर भोसलेंचा पराभव झाला.
त्यानंतर २00९ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरून पहिले आमदार झाले होते. परंतु राष्ट्रवादीशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि शिवसेनेच्या तिकिटावर आमदारही झाले. आता त्यांच्या गळ््यात मंत्रिपदाची माळ पडली. केसरकरांचा राजकीय प्रवास नगरसेवक ते मंत्री असा वाखणण्याजोगा असला तरी कोणतेही राजकीय पाठबळ नसताना त्यांची राजकारणातील धाडसी पावले फलदायीच ठरली आहेत, हे विशेष.


...मी पण पालकमंत्री होईन
वर्षभरापूर्वीच्या जिल्हा नियोजन बैठकीवेळी तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे व दीपक केसरकर यांच्यात विकासकामांवरुन तूतूमैमै झाली होते. त्यावेळी संतापून राणे यांना उद्देशून, मी पण पालकमंत्री होईन, असे म्हटले होेते. शुक्रवारी दीपक केसरकर यांच्या शपथविधीनंतर त्यांचे हे बोल खरे ठरल्याचे दिसून आले.

बदलत्या लाटेवर स्वार होऊन नेतृत्व
२००९ साली प्रवीण भोसले व केसरकर यांच्यात विधानसभा निवडणुकीत तिकीट कोणाला मिळणार, यावरून चांगलीच रस्सीखेच झाली होती.
पण आघाडीला जागा सुटल्याने काँग्रेस नेते नारायण राणे यांचा शब्द अंतिम मानला जात असे. शरद पवार यांनी कुणाला तिकीट द्यावे, याचा सर्वस्वी निर्णय नारायण राणेंवर सोडला.
नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्या पारड्यात आपले मत टाकले. २००९ च्या निवडणुकीत तिरंगी लढतीत १८ हजाराच्या मताधिक्याने केसरकर विजयी झाले होते. २००९ ते २०१४ या पाच वर्षात सिंधुदुर्गच्या राजकारणात अनेक बदल झाले.


राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराजी!
राज्यात आघाडी पण सिंधुदुर्गमध्ये आघाडीत बिघाडी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक सदस्य काँॅग्रेसने फोडले होते. हा राग राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात होता.
पण राष्ट्रवादीचे नेते नारायण राणे हे राज्यात एक वजनदार मंत्री असल्याने त्यांच्याविरोधात कसे जायचे, म्हणून आपल्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेहमी खच्चीकरण करत राहिले. सिंधुदुर्गात येऊन इशारे द्यायचे आणि मुंबईत मांडीला मांडी लावून बसायचे, अशी खंत केसरकर यांच्या मनात होती.
केसरकर यांनी कोणताही नवा प्रकल्प आणला की, त्याला खो घालण्याचे काम काँॅग्रेस नेते नारायण राणे करत असत.
यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी काँॅग्रेस उमेदवार नीलेश राणे यांच्या विरोधात बंड केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तिथेच सिंधुदुर्गच्या राजकारणाला कलाटणी मिळाली होती.

Web Title: Awesome State Travel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.