आक्सा बीचवर बुडणाऱ्या तीन तरुणांना वाचवले
By admin | Published: May 11, 2017 03:13 AM2017-05-11T03:13:24+5:302017-05-11T03:13:24+5:30
बुधवारी सकाळी मालाड (प.) येथील आक्सा बीचवरील दाणापाणी येथे बुडणाऱ्या तीन तरुणांना येथील जीवरक्षकांनी वाचवत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बुधवारी सकाळी मालाड (प.) येथील आक्सा बीचवरील दाणापाणी येथे बुडणाऱ्या तीन तरुणांना येथील जीवरक्षकांनी वाचवत त्यांना जीवदान दिले. मालवणी येथील सर्फराज रहीम शेख, अल्ताफ मोहम्मद इक्बाल आणि सुरज गणेश प्रजापती हे तीन तरुण सकाळी ८ वाजता दाणापाणी येथील खडकावर गप्पा मारत बसले होते. मात्र, याच काळात समुद्राला भरती सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. परिणामी, खडकाच्या सर्व बाजूने आलेल्या पाण्याने त्यांना घेरले आणि ते तरुण बुडू लागले.
येथे तैनात असलेल्या नथुराम सूर्यवंशी आणि स्वतेज कोळंबकर या जीवरक्षकांना घटना समजताच त्यांनी पोलिसांना याची माहिती देत, आणखी मदतीची मागणी केली. शिवाय जॅकेट आणि रिंगच्या मदतीने त्यांनी बुडणाऱ्या मुलांना सुखरूप बाहेर काढत मालवणी पोलिसांच्या हवाली केले.
दरम्यान, नथुराम सूर्यवंशी आणि स्वतेज कोळंबकर या जीवरक्षकांच्या कार्याचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी कौतुक केले आहे.