सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न
By admin | Published: January 13, 2017 05:11 PM2017-01-13T17:11:30+5:302017-01-13T17:11:30+5:30
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या तिस-या दिवशी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या तिस-या दिवशी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला. या यात्रेत महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात.
महाराष्ट्रात ज्या प्रमुख यात्रा भरतात, त्यात सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेचा प्रामुख्याने समावेश आहे. श्री सिद्धेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात सोलापुरात वास्तव्य केले होते. त्यांनी सोलापूरनगरीला ‘भू-कैलास’ या नावाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. शहराच्या पंचक्रोशीत त्यांनी 68 लिंगांची प्रतिष्ठापना केली होती. एवढेच नव्हे, तर त्यांनी जनसामान्यांच्या सामूहिक श्रमदानातून तलावाची निर्मिती केली होती. या तलावाला तीर्थक्षेत्राची प्रतिष्ठा लाभली. महाराजांनी अध्यात्मावर कन्नड वचने रचून आपल्या अंत:करणातील भक्तिभावनेला शब्दरूप दिले. यानिमित्त सिद्धेश्वर महाराजांचे स्मरण म्हणून दरवर्षी संक्रांतीच्या वेळी सिद्धेश्वर यात्रा भरते.
अशी आहे आख्यायिका
सिद्धेश्वर महाराज सोलापुरात वास्तव्यास असताना त्यांच्या सेवेसाठी असलेली एक कुंभार कन्या त्यांची निस्सिम भक्त बनली. महाराजांची भेट झाल्यानंतर तिने महाराजांबरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. पण, सिद्धेश्वर महाराजांनी आपण ‘लिंगांगी’ असल्याने विवाह करून शकत नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्या कुंभारकन्येचा आग्रह कायम होता. तेव्हा महाराजांनी तिच्या इच्छेला मान देत आपल्या योगदंडाबरोबर प्रतीकात्मक विवाह करण्यास सुचवले. त्याप्रमाणे त्या कुंभारकन्येचा योगदंडाशी विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे स्मरण म्हणून दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा भरविली जाते. झाला. त्या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी हा प्रतिकात्मक सोहळा पाच दिवस चालते तिच सिद्धेश्वरची यात्रा म्हणून ओळखली जाते.