अमृता फडणवीसांना ठाकरे सरकार देणार 'अॅक्सिस' धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 01:56 PM2019-12-25T13:56:22+5:302019-12-25T14:12:57+5:30
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक निर्णय मुख्यमंत्री ठाकरे बदलणार
मुंबई: पोलीस कर्मचाऱ्यांची अॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय लवकरच ठाकरे सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. अॅक्सिस बँकेत २ लाख पोलीस कर्मचाऱ्यांची खाती आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. फडणवीस यांच्या पत्नी अमृता अॅक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारनं पोलिसांची खाती वळती करण्याचा निर्णय घेतल्यास तो अमृता फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस ट्विटरवरुन वारंवार शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं हा निर्णय घेतल्यास ते अमृता फडणवीसांच्या टीकेला उत्तर असेल.
पोलीस कर्मचाऱ्यांची खाती पुन्हा एकदा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारानंतर घेतला जाऊ शकतो, असं वृत्त 'मुंबई मिरर'नं दिलं आहे. सध्या २ लाख पोलिसांची खाती अॅक्सिस बँकेत आहेत. या खात्यांमध्ये वेतनाच्या स्वरुपात जवळपास वर्षाकाठी जवळपास ११ हजार कोटी रुपये जमा होतात. मात्र लवकरच राज्य सरकार ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळती करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका अॅक्सिस बँकेला बसेल.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ३० डिसेंबरला होणार असल्याचं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'नं दिलं आहे. त्यानंतर पोलिसांची अॅक्सिस बँकेतली खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांची खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्याचा निर्णय घेतला होता. फडणवीस यांच्या पत्नी अॅक्सिस बँकेत उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या निर्णयावर काँग्रेस-राष्ट्रवादीनं जोरदार आक्षेप घेतला होता.