ठाण्यातील मारहाणीच्या घटनेवर अयोध्या पौळ यांची पहिली प्रतिक्रिया, गंभीर आरोप करत म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:49 PM2023-06-17T12:49:55+5:302023-06-17T12:50:20+5:30
Ayodhya Pol: युवा नेत्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांना काल रात्री ठाण्यातील कळवा परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मारहाण कऱण्यात आली. या मारहाणीप्रकऱणी अयोध्या पौळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
ठाकरे गटाची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या युवा नेत्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांना काल रात्री ठाण्यातील कळवा परिसरात एका कार्यक्रमादरम्यान मारहाण कऱण्यात आली. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. दरम्यान, या मारहाणीप्रकऱणी अयोध्या पौळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. घटनास्थळी काय झालं, पोलिसांनी काय भूमिका घेतली, याबाबत अयोध्या पौळ य़ांनी गंभीर आरोप केले आहेत.
अयोध्या पौळ यांनी सांगितले की, मनीषा चरडे नावाच्या महिलेने मला ८ जून रोजी व्हॉट्सअॅपवर निमंत्रण पाठवलं होतं. त्यानंतर लगेच त्यांनी मला फोन केला. त्यामध्ये त्यांनी निमंत्रणामध्ये माझा समाजसेविका आणि सौ. असा उल्लेख केला होता. त्यावरून मी त्यांना काही सुधारणा सूचवल्या. मी फोनवर बोलताना त्यांचा परिचय विचारला. तेव्हा त्यांनी मी शिवसेनेची पदाधिकारी आहे, अशी ओळख सांगितली. माझा नंबर तुम्हाला कुणी दिला असं विचारलं असता त्यांनी मला केदार दिघेंचं नाव सांगितलं. मी म्हटलं ठिक आहे.
दरम्यान, काल मी तिथे गेले असता पोलिसांच्या समोर, पोलीस सर्व काही बघत होते. प्रसारमाध्यमेही तिथे होती. या सर्वांसमोर त्या मला मारत होत्या आणि मी हसत होते. कारण जिथे आपण न्याय मागायला जातो. त्या पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला मारहाण होत होती. जे पोलीस ठाणे भारतीय घटनेनुसार चालतं तिथे मला मारहाण होत होती आणि पोलीस हतबलपणे बघत होते, असा आरोप अयोध्या पौळ यांनी केला.
जर तुम्ही महामानवांच्या कार्यक्रमाला बोलावून मला मारहाण करण्यात आली. मात्र मी संयमी भूमिका घेतली. अहिंसेचा मार्ग मी निवडला. अहिंसेची भूमिका घेत मी सगळं बघत होते. इथून पुढेही मी अहिंसेचाच मार्ग मी निव़डणार आहे. मी तायक्वांडो ब्लॅकबेल्ट आहे. मी स्वत:चं संरक्षण स्वत: करू शकते. पण तरीही मी संरक्षणाची मागणी करते.
दरम्यान, संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात विरोधी पक्षात आहे म्हणून एका महिलेवर हल्ला झाला आहे. पोलीस काय करात आहेत. पोलीस आयुक्तांना सवाल आहे. हीच का तुमच्या शहरातील महिलांची सुरक्षा. अयोध्या पौळ ही आमच्या महिला आघाडीची कार्यकर्ती आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असते. म्हणूनच तिला फसवून एका कार्यक्रमाला बोलावलं आणि तिथे तिच्यावर हल्ला झाला. याला डरपोकपणा म्हणतात, हिंमत असेल तर समोरासमोर या, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.
दरम्यान,काल कळव्यातील मनिषा नगर भागात अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात महापुरुषांच्या फोटोला हार घालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शेवटी हार का घातला म्हणून या वादाला सुरुवात झाली. त्यावेळी स्थानिक महिला मोठ्या संख्येने होत्या. ठाकरे गटाचा कार्यक्रम म्हणून अयोध्या पोळ यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अयोध्या पोळ यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस स्टेशन बाहेर येताच अयोध्या पोळ यांना काही महिलांनी मारहाण करण्यात आली.