"काही जणांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत, त्यांचं नाव घेताच काहींच्या पोटात दुखतं"; शरद पवारांना टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 06:01 PM2020-07-22T18:01:32+5:302020-07-22T18:04:50+5:30

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे विश्वस्त गोविंदगिरी महाराजांनी आज उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचं अनौपचारिक आमंत्रण देऊन टाकलं आणि जाता-जाता शरद पवारांनाही ‘टोकलं’.

Ayodhya Ram Mandir: Govindgiri Maharaj hits back at Sharad Pawar over his comment on Narendra Modi | "काही जणांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत, त्यांचं नाव घेताच काहींच्या पोटात दुखतं"; शरद पवारांना टोमणा

"काही जणांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत, त्यांचं नाव घेताच काहींच्या पोटात दुखतं"; शरद पवारांना टोमणा

Next

‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांनी बाहेर काढायला हवं’’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाला अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनावरून टोला लगावला होता. त्यावरून, राजकीय वर्तुळात वाद-प्रतिवाद, टीका-टिप्पणी, उलटसुलट चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण येणार का आणि ते अयोध्येला जाणार का?, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. या पार्श्वभूमीवर, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे विश्वस्त गोविंदगिरी महाराजांनी आज उद्धव ठाकरेंना भूमिपूजनाचं अनौपचारिक आमंत्रण देऊन टाकलं आणि जाता-जाता शरद पवारांनाही ‘टोकलं’.

काही लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. त्यांचं नाव घेतलं की काहींना ‘कुछ कुछ होता है’. त्यांच्या पोटात दुखायला लागतं. त्यांनी काहीही केलं तर लोक विरोध करत राहतात, अशी टिप्पणी करत गोविंदगिरी महाराजांनी पवारांना चिमटा काढला. रामावर अनेकांचं प्रेम आहे, पण मोदींबद्दल कटुता. पंतप्रधानांना विरोध करण्याचं निमित्त शोधलं जातं, असंही त्यांनी नमूद केलं.

भाजपा अनोख्या पद्धतीनं निषेध करणार; शरद पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवणार

शरद पवारांच्या राम मंदिरावरील विधानाबद्दल खासदार उदयनराजे म्हणतात...

अयोध्येतील राममंदिर हा फक्त मंदिर आणि एका वास्तूचा प्रश्न नसून तो स्वाभिमानाचा विषय आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत देशातील लोकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे ते नक्कीच होईल. औषधापेक्षा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि तो या मंदिरामुळे निर्माण होणार आहे, असं मत गोविंदगिरी महाराजांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमाची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. कारण, शरद पवारांनी त्यावरून मोदी सरकारचे कान खेचायचा प्रयत्न केलाय, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी अयोध्येतील राम मंदिराचा विषय बऱ्याच अर्थांनी महत्त्वाचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील सत्तेत एकत्र आहेत. शरद पवार तर या महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जातात. असं असताना, आता उद्धव ठाकरे काय करणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

"शरद पवार रामद्रोही! त्यांचे ते विधान मोदीविरोधी नव्हे, तर श्रीरामविरोधी" उमा भारतींची घणाघाती टीका

‘ज्यांना यायचंय, त्यांचं स्वागतच!’

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, पुण्यातील पत्रकार परिषदेत गोविंदगिरी महाराजांनी ‘ज्यांना यायचंय, त्यांचं स्वागतच आहे’, असं सूचक विधान केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असावं. किंबहुना, देशाच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला या गौरवशाली सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलं पाहिजे. पण, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावल्यास ते हेलिकॉप्टरने येतील आणि त्यांचं नियोजन करणं कठीण होईल. तरीही ज्यांना यायचं असेल त्यांचं स्वागत असेल. त्यांनी अवश्य यावे, असं ते म्हणाले. अयोध्येत उत्सव होत असताना सर्वच जण प्रत्यक्षात तिथे जाऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्या नागरीकांनी आपल्या घरात, गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून उत्सव साजरा करावा, असं आवाहन गोविंदगिरी महाराजांनी केलं.   

शरद पवारांच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; धर्मावर अन् देवावर श्रद्धा कायम असते, तसेच...

"मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचे साकडे का घातले?"

अन् मोदी भूमिपूजनाला यायला तयार झाले...  

कोरोनाचे संकट तर आहेच. पण काही कामांसाठी प्रत्यक्षात जावं लागतं. बंगालमध्ये चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोदी जाऊ शकतात तर इथे यायला काय हरकत आहे, असे मी त्यांना सांगितले होते. त्यामुळे मोदी भूमिपूजनाला यायला तयार झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Ayodhya Ram Mandir: Govindgiri Maharaj hits back at Sharad Pawar over his comment on Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.