Ayodhya Verdict: लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निकाल - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 02:48 PM2019-11-09T14:48:36+5:302019-11-09T15:04:59+5:30
Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वागत
मुंबई: अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीची मूल्यं आणखी मजबूत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे वेगळ्या चष्मातून पाहू नका. यामुळे कोणचाही विजय अथवा पराजय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे लोकशाही मूल्यं अधिक मजबूत होतील. जवळपास सर्वांनीच या निकालाचं उत्साहात स्वागत केलं आहे. मुंबईसह राज्यभरात अतिशय चांगलं वातावरण पाहायला मिळत आहे. याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. यापुढेही राज्यात शांतता कायम राहील, असा विश्वास वाटतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील आणि येत्या काही दिवसात येऊ घातलेले विविध धर्मांचे सण अतिशय उत्साहात साजरे होतील, अशी आशा फडणवीसांनी व्यक्त केली. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोदींनी भारतभक्तीचा उल्लेख केला. भारतभक्तीचा हाच भाव देशात दिसतो आहे. हाच खरा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आहे. नव्या भारताच्या उभारणीसाठी आपण सगळे एकजुटीनं प्रयत्न करू,' असं आवाहन त्यांनी केलं.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. तीन महिन्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी योजना आखा. एक न्यास स्थापन करुन मंदिर निर्माणाचा आराखडा द्या, अशा सूचना न्यायालयानं दिल्या आहेत.