आयुक्यांनी केल्या बदल्या
By admin | Published: April 7, 2017 03:11 AM2017-04-07T03:11:03+5:302017-04-07T03:11:03+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी काढला
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी काढला. यातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बदल करुन काही जणांवर अतिरीक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
काशिमिरा हायवे पट्टा, हाटकेश, महाजनवाडी, पेणकरपाडा, घोडबंदर या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली असताना त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. या प्रभाग कार्यालयाचे अधिकारी संजय दोंदे यांच्या या कारभारात दुटप्पीपणाची कारवाई केली जात असल्याच्या तक्रारींसह त्यांची भूमाफिया यांच्या समवेत झालेल्या चर्चेचे संवाद रेकॉर्डिंग करुन पिडीतांनी आयुक्तांना तक्रारींसोबत दिले होते. अखेर आयुक्तांनी त्याची दखल घेत दोंदे यांची प्रभाग कार्यालय सहा मधून उचलबांगडी केली. त्यांना जाहिरात विभागासह घनकचरा प्रकल्पातील दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्याचे वजनकाट्याद्वारे मोजमाप तसेच कचरा गाड्यांच्या दैनंदिन फेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याच प्रभाग कार्यालयात सहायक अधिकारी म्हणून असलेले प्रकाश कुळकर्णी यांना याच प्रभागातंर्गत मुख्य शहरातील बेकायदा बांधकामांसह इतर महत्वाच्या प्रशासकीय कारभाराचे क्षेत्र सोपविण्यात आले आहे. तर उर्वरित काशिमिरा हायवे पट्टा, हाटकेश, महाजनवाडी, पेणकरपाडा, घोडबंदर आदी क्षेत्रातील बेकायदा बांधकामांसह दैनंदिन प्रशासकीय कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जाधव यांची प्रभाग कार्यालय तीनमधून उचलबांगडी करुन त्यांना प्रभाग कार्यालय सहामध्ये बदली करण्यात आली आहे. स्थानिक संस्था कर विभागप्रमुख तसेच वाहनविभागाचे प्रमुख अधिकारी सुदाम गोडसे यांची प्रभाग कार्यालय तीनमध्ये बदली झाली आहे. त्यांच्याकडील वाहन विभागाचा अतिरीक्त कार्यभार लेखापरीक्षण विभागातील सहायक मुख्य लेखापरीक्षक चिंतामण शिंदे यांच्याकडे दिला आहे. (प्रतिनिधी)
>दोंदे, जाधवांचा भोंगळ कारभार
स्थानिक संस्था कर विभागाच्या प्रमुखपदी परिवहन विभागातील लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले जनार्दन भासे यांची बदली करण्यात आली आहे.
दोंदे, जाधव यांच्यासह इतर प्रभाग अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारावर अंकुश ठेवून त्यांची मार्च महिन्यातच बदली करण्याचे आदेश आयुक्तांनी आस्थापना विभागाला दिले होते.