डिसेंबरमध्ये कोल्हापुरात आयुर्वेद परिषद
By Admin | Published: October 17, 2014 12:34 AM2014-10-17T00:34:57+5:302014-10-17T00:34:57+5:30
वनौषधी विद्यापीठ संस्थेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष
कोल्हापूर : येथील वनौषधी विद्यापीठ संस्थेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त कोल्हापुरात १३ व १४ डिसेंबरला आठवी पॅनासिआ आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, वनौषधी, निसर्गोपचार, पर्यायी उपचारपद्धतीचे संशोधक सहभागी होणार असल्याची माहिती वनौषधी विद्यापीठाचे अध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. पाटील म्हणाले, संस्थेच्यावतीने यापूर्वी मॉरिशस, मलेशिया, थायलंड, दुबई, सिंगापूर, श्रीलंका, सर्बिया अशा देशांत ही परिषद झाली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या परिषदेमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर्स, वैद्यक व्यवसायी, संशोधक, चिकित्सक, वनौषधी तज्ज्ञ, औषधीनिर्माण शास्त्र (फार्मसी) तज्ज्ञ, निसर्गोपचार तज्ज्ञ, होमिओपॅथी, योग, पर्यायी उपचारपद्धतीद्वारे वैद्यक व्यवसाय करणाऱ्यांचा सहभाग असेल.आयुर्वेदाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या डॉक्टर्सना सन्मानित करण्यात येणार आहे.
परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या आयुर्वेदाच्या विशेष सवलतीच्या शुल्कामध्ये सहभागी होऊन संशोधन प्रबंध किंवा पोस्टर प्रेझेंटेशन करता येणार आहे. अमेरिका जपान, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इटली, सर्बिया, फ्रान्स, मॉरिशस या देशांतील व भारतातील विविध राज्यांत आयुर्वेद संशोधन आणि चिकित्सा क्षेत्रात कार्यरत असणारे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ. हृषिकेश जाधव, डॉ. हरिष नांगरे, शीतल देशपांडे, अश्विनी माळकर उपस्थित होते.