मधुमेहावरील आयुर्वेदिक औषधाची निर्मिती
By admin | Published: May 23, 2016 01:59 AM2016-05-23T01:59:57+5:302016-05-23T01:59:57+5:30
जगभरात सर्व देशांमध्ये मधुमेहाच्या उपचारांविषयी चर्चा चालू असताना या आजारावरील आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात यश आले आहे.
पुणे : जगभरात सर्व देशांमध्ये मधुमेहाच्या उपचारांविषयी चर्चा चालू असताना या आजारावरील आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात यश आले आहे. केंद्र सरकारच्या काउंसिल आॅफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रिीाल रिसर्च विभाग (सीएसआयआर- वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) यांच्या वतीने पहिल्या डीपीपी ४ निरोधी उपक्रमासोबत मधुमेहावरील बीजीआर - ३४ अर्थात ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर या आयुर्वेदिक औषधाची निर्मिती करण्यात आली आहे.
मधुमेहाच्या टाईप २ साठी या औषधाची निर्मिती करण्यात आली असून औषधाचा प्रभावीपणा व सुरक्षितता यांची शास्त्रीयदृष्ट्या तपासणी करून ते आता रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सीएसआयआर-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लखनऊ येथील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मेडीसिनल अॅण्ड अरोमटिक प्लँट्स यांच्या संयुक्त विद्यमाने या औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. डीपीपी ४ निरोधींच्या तुलनेत बीजीआर - ३४ ची किंमतही पाच रुपयेइतकी असणार आहे, जी जगभरातील मधुमेहाच्या औषधांपेक्षा नाममात्र आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सीएसआयआर- सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मेडीसिनल अॅण्ड अॅरोमटिक प्लँट्स (सीआयएमएपी)चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी, सीएसआयआर- नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजीवकुमार ओझा, डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या उपप्राचार्या डॉ. मेधा कुलकर्णी व एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडियाचे संचालक एस. पी. श्रीवास्तव उपस्थित होते.
नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ मेडीसिनल अॅण्ड
अॅरोमटिक प्लँट्स यांनी एकत्रितपणे रुग्णांच्या गरजा ओळखत या
टाईप २ मधुमेहावरील औषधाची निर्मिती केली आहे. यासाठी
या दोन्ही संस्थांच्या शास्त्रज्ञांनी आयुर्वेदिक ग्रंथात सांगितलेल्या ५०० हून अधिक प्राचीन जडीबुटींवर संशोधन केले आहे. (प्रतिनिधी)