नगरची आयुषी खेडकर होणार ‘फायटर पायलट’, देशातील अकरा मुलींमध्ये समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 08:15 AM2021-08-21T08:15:43+5:302021-08-21T08:16:17+5:30
Ayushi Khedkar : आयुषीचे प्राथमिक शिक्षण पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले.
पाथर्डी (अहमदनगर) : आयुषी नितीन खेडकर हिने फायटर पायलट होण्याचा बहुमान पटकावत पाथर्डीचा झेंडा अटकेपार फडकविला आहे. देशभरातून निवडल्या गेलेल्या ६१ जणांमध्ये तिचा समावेश असून ती जिल्ह्यातील पहिलीच महिला फायटर पायलट ठरली आहे. यामध्ये ११ मुलींचा समावेश आहे.
डॉ. नितीन व डॉ. मनीषा खेडकर यांची आयुषी ही कन्या आहे. सध्या ती बेंगलोर येथे एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहे. ऑगस्ट २०२० मध्ये तिने फायटर पायलटची परीक्षा दिली. त्याचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. आयुषीचे प्राथमिक शिक्षण पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पुणे येथे झाले. नंतर बीटेक करण्यासाठी ती चेन्नई येथे गेली होती. याच काळात तिने गुवाहाटी येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. तिची एकाच वेळी नौसेना व वायू सेनेत निवड झाली. येत्या १ सप्टेंबरला ती हैदराबाद येथे प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.
दर्डा, मुंडे यांच्याकडून कौतुक
आयुषी हिच्या यशाबद्दल ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी तिचे कौतुक केले आहे. तिच्या यशाचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘हमारी छोरियां भी छोरोसे कम नहीं’, असे ट्वीट करत अभिनंदन केले.
दररोज आठ- दहा तासांची मेहनत
करिअरचे पर्याय माझ्यासमोर होते. बेंगलोर येथे नोकरी करीत असताना संरक्षण खात्यातील माझ्या काही मित्रांमुळे मला हे करिअर करावे वाटले. कर्नल गोखले यांची मला मदत झाली, असे आयुषी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली. आयुषीने अत्यंत मेहनत घेतली. नोकरी करताना रात्री दररोज आठ-दहा तास तिने अभ्यास करून ध्येय गाठले, असे तिच्या वडिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.