सावधान! आयुष्मान भारतच्या 'या' लिंकवर क्लिक करू नका...
By हेमंत बावकर | Published: October 22, 2018 11:33 AM2018-10-22T11:33:31+5:302018-10-22T12:32:36+5:30
आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
मुंबई : देशातील गरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2011 च्या सामाजिक जनगणनेनुसार 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचा आरोग्य विमा कवच पुरविले आहे. मात्र, या आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे. ही बनावट लिंक असून तुमची माहिती मिळविण्यासाठी याचा वापर केला जात आहे.
काय आहे हा मॅसेज?
13 ते 70 वर्षांच्या 10 कोटी लोकांना 5 लाख रुपयांचा नि:शुल्क विमा देण्यात येत आहे. या साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 ऑक्टोबर आहे. यामुळे लवकरात लवकर या लिंकवरील वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करा. तसेच ही लिंक मित्रांसोबतही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील.
या मेसेजनंतर https://Govt-Yojna.org.in/Ayushmaan-Bharat/?Apply-Here ही लिंक देण्यात आलेली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि भारत सरकारचा लोगो असलेला मोठा बॅनर दिसतो. यानंतर संबंधित व्यक्तीकडे त्याच्या विषयीची माहिती मागितली जाते. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, वय, राज्य या बाबींचा समावेश आहे.
ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला काही प्रश्नही विचारले जातात. या प्रश्नांच्या उत्तरानंतर अर्ज यशस्वीपणे मिळाल्याचे सांगितले जाते. यानंतर डिजिटल India च्या प्रचारासाठी आणि व्हेरिफिकेशनसाठी WhatsApp 10 ग्रुपमध्ये ही लिंक शेअर करावी लागेल असे सांगितले जाते. यानंतर निळ्या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर मिळणार असल्याने भासवले जाते. https://govt-yojna.org.in/Ayushmaan-Bharat/step2.html ही ती लिंक आहे, जी माहिती न भरताच उघडते.
'लोकमत'ने केलेल्या तपासानुसार ही लिंक बनावट आहे. या द्वारे तुमची माहिती चोरली जाते. या माहितीमध्ये तुमचा मोबाईल क्रमांकही दिला जात असल्याने याचा वापर अन्य कारणांसाठी होणार आहे. या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा मेसेज करून फसवणुकीचे प्रकारही होण्याची शक्यता आहे. यामुळे या लिंकवर माहिती भरण्यापासून सावध राहिल्यास चांगले.
सत्य काय?
केंद्र सरकारची खरी लिंक https://www.abnhpm.gov.in/ ही आहे. या वेबसाईटवरील फोटो वापरण्यात आला आहे. खरे म्हणजे, आयुष्मान योजनेसाठी केंद्र सरकारने 2011 च्या सामाजिक जनगणनेनुसार 10 कोटी कुटुंबांना आधीच निवडलेले आहे. यामध्ये समावेश नसलेल्या कुटुंबांसाठी रजिस्ट्रेशन करता येणार नाही. यामुळे अशी कोणतीही लिंक देण्यात येणार नाही. यामुळे या योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या व्यक्तींमधील नाराजीचा फायदा काही समाजकंटक घेण्याची शक्यता आहे. ही बनावट लिंक याचाच एक भाग आहे.