आझम खान की अफझल खान? - उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
By admin | Published: December 8, 2015 09:27 AM2015-12-08T09:27:08+5:302015-12-08T10:16:54+5:30
बाबरी शहीद झाली नसती तर मुंबईत बॉम्बस्फोट झाले नसते असे म्हणणारे आझम खान म्हणजे 'अफझल खान' असून त्यांनी राष्ट्रविरोधी आणि हिंदूंविरोधी गरळ ओकण्याचा विडाच उचलला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - ‘बाबरी शहीद झाली नसती तर मुंबईत बॉम्बस्फोट वगैरे झाले नसते' असे वक्तव्य करणारे सपा नेते आझम खान म्हणजे 'अफझल खान' असून त्यांनी राष्ट्रविरोधी आणि हिंदूंविरोधी गरळ ओकण्याचा विडाच उचलला आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांनी आझम खान यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मुस्लिम धर्मांधतेला गोंजारत हिंदूंच्या श्रद्धा आणि भावनांना दुखविण्याची उबळ या आझम खान महाशयांनाही अधूनमधून येत असते. पॅरिसमध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतरही त्यांनी या दहशतवादी कृत्याचे अप्रत्यक्ष समर्थन करत युरोपियन राष्ट्रांनी सीरियावर केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचे म्हटले होते. हे असे साप - विंचू आपल्याच देशात असल्यावर परदेशी दुश्मनांची गरज नाही, असे टोला उद्धव यांनी मारला आहे. त्यामुळे पाकिस्तानशी लढण्याची भाषा करणार्यांनी आधी आझम खानसारख्यांना सुतासारखे सरळ केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
काय म्हटले आहे अग्रलेखात?
- समाजवादी पार्टीचे ‘शांतिदूत’, ‘महात्मा’ वगैरे असलेले आझम खान यांचे हिंदूंविरोधी, राष्ट्रविरोधी फूत्कार सोडण्याचे उद्योग सुरूच असतात. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आता असे गरळ ओकले आहे की, अयोध्येत राम मंदिर नाही तर बाबरी मशीदच पुन्हा उभी राहील. तर सपाच्या आझम खान यांना मुस्लिम धर्मांधतेला गोंजारत हिंदूंच्या श्रद्धा आणि भावनांना दुखविण्याची उबळ अधूनमधून येत असते. त्यांनीही ओवेसी यांच्याप्रमाणेच बाबरीप्रकरणी दोन दिवसांपूर्वी बेताल बडबड केली. आता ओवेसी यांचे अयोध्येत बाबरी उभी राहण्याचे हिरवे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि तेथे प्रभू श्रीरामचंद्रांचेच भव्य मंदिर उभे राहील हा भाग वेगळा. खरे म्हणजे ओवेसी काय किंवा आझम खानसारखी अन्य मुस्लिम धर्मांध मंडळी काय, त्यांनी उधळलेली मुक्ताफळे तशी फारशी गांभीर्याने घ्यायची नसतात, पण यानिमित्ताने या लोकांच्या डोक्यात काय कचरा भरला आहे ते लक्षात येते.
- आझम खान असे म्हणाले की, ‘‘बाबरी शहीद झाली नसती तर मुंबईत बॉम्बस्फोट वगैरे झाले नसते.’’ म्हणजे एकप्रकारे आझम खान यांनी मुंबई नरसंहाराचे समर्थनच केले आहे. पॅरिसमध्ये अलीकडे जो भयंकर दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही आझम खान यांनी त्या दहशतवादी कृत्याचे अप्रत्यक्ष समर्थनच केले होते. युरोपियन राष्ट्रांनी सीरियावर केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचे त्यांनी सांगितले. हे असे साप आणि विंचू आपल्याच देशात असल्यावर परदेशी दुश्मनांची गरज नाही. पाकिस्तानशी लढण्याची भाषा करणार्यांनी आधी आझम खानसारख्यांना सुतासारखे सरळ केले पाहिजे. दादरी प्रकरणानंतर हिंदुस्थानातील मुसलमानांवरील अत्याचारांविरोधात हा माणूस ‘युनो’त दाद मागायला निघाला होता. यास देशद्रोह नाही तर काय? पोलिसांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले म्हणून गुजरातचा ‘पाटीदार’ नेता देशद्रोहाच्या आरोपाखाली बंदिवान आहे, पण त्याच हिंदुस्थानात देशद्रोहाचे शंभर अपराध करूनही आझम खान मोकळा कसा, हा महत्त्वाचा सवाल आहे.
- हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे आझम खान यांच्या तुलनेत मवाळ म्हणावेत असे कधी कधी वाटते. अलीकडेच मुंबईतील सिनेमागृहातील ‘राष्ट्रगीत’ प्रकरणावर ओवेसी यांनी संयमी भूमिका घेतली होती. सिनेमागृहात राष्ट्रगीताच्या वेळी मुस्लिम कुटुंब उभे राहिले नाही व त्यावर वादंग माजला. ओवेसी यांनी राष्ट्रगीताचा सन्मान राखला पाहिजे व त्याबाबत कायदा असेल तर कायदा पाळला पाहिजे असे मत व्यक्त केले होते. ओवेसी यांच्या अनेक भूमिका आम्हाला मान्य नाहीत व अनेकदा आम्ही त्यांच्यावर सडकून टोकाची टीका केली आहे. पण ओवेसींची मोठी पाती अनेकदा समंजस भूमिका घेत असते व आझम खानसारख्यांनी त्यांच्यापासून काही शिकायला हवे.
- जे खरे आहे ते छातीठोकपणे आम्ही बोलतो व जे चुकीचे आहे ते खणखणीतपणे मांडायला आम्ही मागेपुढे पाहत नाही. कारण या देशात मुसलमानी मतांचे ठेकेदार रोज धादांत खोटी विधाने करून तणावात तेल ओतीत आहेत. मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी आझम खान बाबरीच्या पतनास जबाबदार ठरवीत आहेत. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाबरी ‘शहीद’ झाली म्हणजे नक्की काय? बाबर हा एक परदेशी आक्रमक होता व त्याने अयोध्येत घुसून राम मंदिराचा विध्वंस केला. रामाची अयोध्या बाबराची कधीपासून झाली याचे उत्तर आज आझम खानही देऊ शकणार नाहीत. बाबर अयोध्येत जन्माला आला आणि मग प्रभू श्रीराम इस्लामाबादेत जन्मले काय, हा एक साधा सवाल आहे. पण असे निरलस प्रश्न विचारल्याने धर्मनिरपेक्षता वगैरे धोक्यात येत असते आणि त्या धोक्याच्या घंटा बडवीत एकजात सगळे निधर्मी ढोंगी हिंदूंच्या विरोधात ठणाणा करीत असतात.