बा देवा महाराजा, सालाबादप्रमाण यंदाय टोलमाफी करतय...; मुख्यमंत्र्यांची गणेशभक्तांसाठी मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 08:19 PM2024-09-04T20:19:08+5:302024-09-04T20:20:42+5:30
Ganeshotsav Toll Free Pass: गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे.
गणेशोत्सवासाठी सालाबादप्रमाणे यंदाही टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीसाठी टोल माफ केला जाणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे. गेल्यावर्षी सरकारने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांपूर्वीच शिंदेंनी या महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी केली होती. एकंदरीतच हा महामार्ग आणखी काही वर्षे तरी चांगल्या प्रकारे सुरु होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे वाहन चालकांना एक्स्प्रेस वे व्हाया पुणे कोल्हापूर महामार्गाचा कोकणात जाण्यासाठी वापर करावा लागत आहे.
एक्स्प्रेस वेचा आणि पुणे-कोल्हापूर मार्गाचा टोल पाहता नाहकचा भुर्दंड वाहन चालकांना पडत आहे. गणेशभक्तांना हा भुर्दंड पडू नये म्हणून गेल्या काही वर्षांपासून टोलमाफी केली जाते. मुंबई, पुण्यातील पोलीस, आरटीओ ऑफिसमध्ये यासाठी पास दिले जातात. यानुसार पास धारक टोल न देता प्रवास करू शकतात. येत्या ७ सप्टेंबरला गणपती बसणार आहेत. यामुळे कोकणात जाण्याऱ्या लोकांचा प्रवास सुरु झाला आहे.
या लोकांना उद्यापासून पास मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सूट दिली जाणार आहे. ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ असे स्टीकर्स आणि पास उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस स्टेशन आणि आरटीओंना देण्यात आले आहेत. यावर वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव आदी मजकूर असणार आहे.