बा...विठ्ठला, शेतकरी कर्जमुक्त होऊ दे!

By admin | Published: July 5, 2017 04:35 AM2017-07-05T04:35:25+5:302017-07-05T04:35:25+5:30

देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे़ ‘बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे !’, असे साकडे राज्याचे

Ba ... Vitthal, let the farmers be debt free! | बा...विठ्ठला, शेतकरी कर्जमुक्त होऊ दे!

बा...विठ्ठला, शेतकरी कर्जमुक्त होऊ दे!

Next

प्रभू पुजारी/ लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर (जि. सोलापूर) : देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे़ ‘बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे !’, असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाकडे घातले़
आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे २़२० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान यंदा बुलढाणा जिल्ह्यातील बाळसमुद्र (ता़ सिंदखेडराजा) येथील परसराम उत्तमराम मेरत व त्यांच्या पत्नी अनुसया या वारकरी दाम्पत्याला मिळाला. शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मानाच्या वारकऱ्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, शाल, साडी आणि महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा वर्षभराचा मोफत पास व १५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला़
याप्रसंगी स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे नूतन अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले, आदी उपस्थित होते़
मुख्यमंत्री म्हणाले, आळंदी ते पंढरी आणि देहू ते पंढरी पायी वारी म्हणजे सुख देणारा सोहळा असतो़ वारकरी मजल दरमजल करीत पांडुरंगाच्या ओढीने झपाझप पाय टाकत पंढरीला येतात़ भक्तिभावाने प्रेरित झालेली ही वारी असते़
भारत-कॅनडा मैत्रीचा करार झाला असून, त्यांनी स्वत:हून पंढरपूरच्या विकासाला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास पंढरीचा नक्कीच विकास होईल़ याबाबतचा प्रस्ताव त्यांच्याकडूनच आल्याने पंढरीचा महिमा आता परदेशातही पाहावयास मिळत आहे़

आठ लाख भाविकांची मांदियाळी
पंढरीत दाखल झालेल्या सुमारे आठ लाख भाविकांपैकी केवळ तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी विठ्ठलाचे पददर्शन व मुख दर्शन घेतले़ उर्वरित भाविकांनी पंढरीत वारी पोहोचवून नगरप्रदक्षिणा पूर्ण केली़़ लोखोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांमुळे पंढरपूर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

जीवनातील सर्वात मोठा सन्मान
यंदा मुख्यमंत्र्यांसमवेतच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळालेले परसराम मेरत दाम्पत्य गेल्या १० वर्षांपासून वारी करतात़ तीन वर्षांपासून ते माऊलींच्या पालखीसह पायी वारीत सहभागी होतात. त्यांची ३ एकर जिरायत शेती आहे़ आमचे पूर्वजन्माचे काही भाग्य असेल म्हणून जीवनात सर्वात मोठा हा सन्मान आम्हाला मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी घेतले कुलदैवत लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी श्रीक्षेत्र निरा-नरसिंहपूर येथील कुलदैवत श्री लक्ष्मी-नृसिंहास कुटुंबासमवेत अभिषेक करुन दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी प्राचिनकालीन माणकेश्वर वाड्यात विकास कामांचा आढावा घेतला.

पालख्यांचा मुक्काम पौर्णिमेपर्यंत
आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांचा मुक्काम हा पौर्णिमेपर्यंत पंढरीत असतो़ पौर्णिमेदिवशी गोपाळपूरचा काला झाल्यानंतर या सर्व पालख्या परतीच्या प्रवासाला लागतात़

समितीमध्ये वारकऱ्यांचा समावेश
आदेशानुसार ३० जूनपर्यंत मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे़ मात्र ही समिती पूर्ण झाली नसून उर्वरित जागांमध्ये वारकऱ्यांचा नक्कीच समावेश केला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले़

सुरक्षा व्यवस्था चोख
विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात़ भाविकांच्या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती़ सुरक्षे व्यवस्थेची तयारी आगाऊ करण्यात आली होती़


शेगावात दीड लाख भाविक

गजानन कलोरे/लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : विदर्भ पंढरी संतनगरी शेगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी दीड लाख भाविकांनी
श्रींचे समाधी दर्शन घेवून आषाढी एकादशी महोत्सव साजरा केला.
श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भक्तांची रांग लांबच लांब रांग लागली होती.
श्री गजाननाची पालखी दुपारी २ वा. परिक्रमेकरीता श्रींच्या मंदीरातून निघाली. तत्पुर्वी श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्याचे व श्री विठ्ठलाच्या तैलचित्राचे पुजन केले. त्यानंतर श्रींची पालखी मंदीरातून ढोलपुरी गेट, श्री दत्त मंदिर, जुने महादेव मंदिर, भोईपुरा, श्री शितलनाथ महाराज संस्थान धर्मशाळा, फुले नगर, श्री मारोती मंदीर, आठवडी बाजार, बसस्थानक, व्यापारपेठ मार्गाने मंदिरात पोहोचली. श्रींचे प्रकटस्थळ येथे विश्वस्त गोविंदराव कलोरे तर महादेव मंदीर येथे विश्वस्त विश्वेश्वर त्रिकाळ, मारोती मंदीर येथे विश्वस्त अशोकराव देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. श्रींची पालखी संध्याकाळी मंदीरात आल्यानंतर महाआरती झाली.

८० हजारावर भाविकांना फराळ!
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने एकादशी यात्रेनिमित्त सुमारे ८० हजाराच्यावर भक्तांनी फराळ महाप्रसादाचा लाभ घेतला. याकरीता साबुदाणा उसळ १०० क्विंटल, नायलॉन चिवडा ३० क्विंटल, खोबरा खिस २० क्विंटल, साखर २५ क्विंटल आदी साहित्याचा वापर करण्यात आला.

Web Title: Ba ... Vitthal, let the farmers be debt free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.