बाराशे कोटींचा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 03:46 AM2017-07-29T03:46:24+5:302017-07-29T03:46:34+5:30
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे.
मुंबई : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ‘गंगाखेड शुगर’ कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व संचालक मंडळाने ३० हजार शेतकºयांच्या खोट्या सह्या व बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल बाराशे कोटींचे कर्ज लाटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही संबंधितांना अटक होत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला.
दरम्यान, यावर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या प्रश्नावरील चर्चेदरम्यान समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने, तसेच न्यायालयीन आदेशाचा सरकारी निवेदनात उल्लेख करण्यात आला नसल्याने, ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आली.
‘गंगाखेड शूगर’चे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी शेतकºयांच्या नावे परस्पर कर्ज लाटल्याचा मुद्दा मुंडे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीेद्वारे उपस्थित केला. गुट्टे यांनी अडीच एकराच्या सातबारावर ५०२ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याची गंभीर बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. २०१२ मध्ये मृत पावलेल्या २२५ शेतकºयांच्या नावे परस्पर कर्ज काढले आहे, तसेच हे कर्ज संबंधित शेतकºयांच्या खात्यांऐवजी गंगाखेड शुगरच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यात बँकांचे अधिकारीही सहभागी आहेत. मागील दहा महिन्यांपासून आपण स्वत: या भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे अन्वेषण आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, सरकारकडून आपल्या पत्रांची कोणतीही दखल घेण्यात आली, उलट गुट्टे यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला, परंतु २२ दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संदर्भात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केलेले निवेदन सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. परभणी, मराठवाडा आणि विदर्भापर्यंत या घोटाळ्याची व्याप्ती आहे.