'बाबासाहेबांना हवे होते महाराष्ट्रात त्रिराज्य'
By admin | Published: April 10, 2016 12:48 PM2016-04-10T12:48:09+5:302016-04-10T12:54:24+5:30
डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्रात त्रिराज्य करण्याची संकल्पना मांडली होती, असं म्हणत डॉ. गंगाधर पानतावणेंनी खळबळ उडवून दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १०- महाराष्ट्रात वेगळं विदर्भ राज्य सध्या वादातीत आहे. डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्रात त्रिराज्य करण्याची संकल्पना मांडली होती. त्रिराज्याचा नकाशाही बाबासाहेबांनी तयार केला होता, असं म्हणत जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणेंनी खळबळ उडवून दिली आहे. यापुढे जाऊन औरंगाबादेतल्या मिलिंद महाविद्यालयात ते त्रिराज्याचा नकाशा समजावून सांगत होते, असे परखड मत डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मांडलं आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. आंबेडकर राइट मूव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर संस्थेतर्फे विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.
डॉ. पानतावणे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी त्रिराज्य योजनेत पूर्व महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशी विभागणी केली होती. आजचे महाराष्ट्र व विदर्भवादी नेते बाबासाहेबांच्या या संकल्पनेचा तसूभरही अभ्यास न करता निव्वळ वादविवाद करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.