बाबा सिद्दिकी यांच्या घरावर छापा
By admin | Published: June 1, 2017 04:13 AM2017-06-01T04:13:32+5:302017-06-01T04:13:32+5:30
वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी काँगे्रस नेते
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी काँगे्रस नेते आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील घर-कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले. ईडीने सिद्दिकी यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत महत्त्वपूर्ण कागदपत्रे ईडीच्या हाती लागली असून, त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत (झोपु योजना) फसवणूक झालेल्या तक्रारदाराने २०१२ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. या योजनेअंतर्गत झोपड्या पाडल्यानंतर निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आले. बनावट कागदपत्रे बनवून येथील व्यवहार करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दिकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर रफीक कुरेशी यांच्यावर आहे. यामध्ये जवळपास ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले. न्यायालयाच्या आदेशाने २०१४ मध्ये वांद्रे पोलीस ठाण्यात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या आधारावर ईडीने २०१७ मध्ये सिद्दिकी यांच्यासह नऊ जणांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यामागे आणखी काही बेनामी कंपन्यांची साखळी असल्याचा संशय
ईडीला आहे. त्यामुळे अधिक पुरावे
गोळा करण्यासाठी एकाच वेळी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती ईडी अधिकाऱ्यांनी दिली.
सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील घर, कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईतून महत्त्वपूर्ण कादगदपत्रे, काही व्यवहारांची माहिती ईडीच्या हाती लागली. या माहितीच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ईडीकडून सांगण्यात आले.
बॉलीवूडमध्ये दबदबा असलेला नेता
बाबा सिद्दिकी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले होते. २००२-०४ या काळात ते म्हाडाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या इफ्तार पार्टीला विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती असते. त्यांचे बॉलीवूडमध्येही अनेक कलाकारांशी चांगले संबंध आहेत.
सलमान खान आणि शाहरूख खान हे सिद्दिकींच्या पार्टीला आवर्जून हजेरी लावत. ईडीच्या कारवाईबाबत विचारणा करण्यासाठी बाबा सिद्दिकी यांना दूरध्वनी केला असता संपर्क होऊ शकला नाही. एसएमएसलाही त्यांनी उत्तर दिले नाही.