ईडीकडून बाबा सिद्दिकी यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 03:15 AM2017-06-10T03:15:01+5:302017-06-10T03:15:01+5:30
वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची शुक्रवारी अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची शुक्रवारी अंमलबजावणी सचालनालयाने (ईडी) कसून चौकशी केली. या प्रकरणी सिद्दिकींची साक्ष नोंदवण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या तपास अधिकाऱ्याने मनी लाँड्रिंग कायद्याखाली सिद्दिकींना समन्स बजावले आहे. याआधीच ईडीने ३१ मे रोजी सिद्दिकींसह त्यांच्याशी संबंधित विकासकाच्या ७ कार्यालयांवर छापे मारले होते. या छाप्यांमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. तरी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत सिद्दिकी यांची चौकशी सुरू होती.
सिद्दिकी यांनी संबंधित विकासकासोबत बनावट कागदपत्रे तयार करून ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. वांद्रे प्रकल्पामध्ये बोगस लाभधारक असून, विकासकाकडून सिद्दिकी यांच्या कंपनीला पैसे गेल्याची कागदपत्रे ईडीला मिळाली असल्याची चर्चा आहे. तरी जबाब नोंदवल्यानंतर सिद्दिकी यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता ईडीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.