बाबा बोर्डिंगमध्ये टाकणार म्हणून ‘तो’ घरातून पळाला
By admin | Published: June 9, 2017 02:03 AM2017-06-09T02:03:33+5:302017-06-09T02:03:33+5:30
वडील बोर्डिंगला शिकण्यासाठी पाठवणार असल्याने नाशिक येथून पळून आलेल्या एक १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडील बोर्डिंगला शिकण्यासाठी पाठवणार असल्याने नाशिक येथून पळून आलेल्या एक १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले आहे. हा मुलगा बुधवारी नाशिक येथून आलेल्या एका ट्रेनमध्ये दादर आरपीएफ पोलिसांना एकटाच आढळून आला. वडील बोर्डिंगला शिकण्यासाठी पाठवणार असल्याने नाशिक येथील घरातून निघून आल्याचे त्याने पोलिसांना
सांगितले. त्यानुसार आरपीएफ जवानांनी त्याच्या वडिलांशी संपर्क करून पुन्हा या मुलाला त्याच्या घरी पाठवले आहे.
बुधवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात आलेल्या एका ट्रेनमध्ये हा मुलगा दरवाजाजवळ एकटाच बसून होता. दरम्यान, याच ट्रेनने प्रवास करणाऱ्या भूषण पाटील नावाच्या प्रवाशाची या मुलावर नजर गेली. त्याने त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र त्याने प्रवाशाला काहीही उत्तर दिले नाही.
गाडी दादर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर पाटील यांनी ही बाब दादर रेल्वे स्थानकावर असलेल्या आरपीएफ पोलिसांना सांगितली. त्यांनी तत्काळ या मुलाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, त्याने पोलिसांना सर्व घटना सांगितली. घरी अभ्यास करत नसल्याने वडिलांनी आपल्याला बोर्डिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घरी कोणालाही काहीही न सांगताच आपण घरातून पळून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ त्याच्या वडिलांशी संपर्क करून त्यांना दादर रेल्वे स्थानकात बोलावून घेतले आणि या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले.