‘बाबा’गिरी जरा जपून!

By admin | Published: May 23, 2017 01:17 AM2017-05-23T01:17:46+5:302017-05-23T01:17:46+5:30

पालक मुलांच्या बाबतीत कधी अतिसंवेदनशील तर कधी अतिशिस्तीचे भोक्ते होतात. मुलं ही पालकांची डबल ढोलकी ओळखतात आणि आपल्या प्रतिक्रि या द्यायला सुरुवात करतात.

'Babaji' is barely sure! | ‘बाबा’गिरी जरा जपून!

‘बाबा’गिरी जरा जपून!

Next

गुरूमंत्र - संतोष सोनवणे
पालक मुलांच्या बाबतीत कधी अतिसंवेदनशील तर कधी अतिशिस्तीचे भोक्ते होतात. मुलं ही पालकांची डबल ढोलकी ओळखतात आणि आपल्या प्रतिक्रि या द्यायला सुरुवात करतात. यालाच पुढे मुले बिघडली आहेत, असा शिक्का मारला जातो. हा शिक्का मारण्यापूर्वी किंवा पालकांना मुले बिघडली आहेत, असे वाटण्यापूर्वी पालकांनी यामागील कारणांचा विचार करायला हवा.
मुलांना शिस्त लावताना पालक आणि मुलं यांच्या नात्यात पालकांचा बऱ्याच वेळा तोल ढळतो आणि त्याची नको ती प्रतिक्रि या उमटताना दिसते. या चुकीच्या प्रतिक्रि येने मुलांच्या मनावर खूप आघात होतात आणि खुलण्याआधी कळ्या कोमेजतात. मात्र पालकांच्या त्या अनियंत्रित भावनांनी आपली परिसीमा गाठलेली असते. अशात पालक व पाल्य यांच्यातील नात्यात हळूहळू दुरावा वाढत जातो, हे पालकांच्या ध्यानीमनी नसते. अशा प्रसंगी पालकांचे आपल्या भावनांवर आपले नियंत्रण असायलाच हवे, मात्र त्यापेक्षा त्या भावनांचं समायोजन किंवा व्यवस्थापन साधता येणे अधिक महत्त्वाचे आहे.
बक्षीस आणि शिक्षा या दोन्ही प्रलोभनांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्व घडण्यावर खूपच प्रतिकूल परिणाम होत असतो. यात मुलांच्या भावनिक व्यक्तिमत्त्वाचा अधिक सहभाग होतो. मुले पालकांच्या स्वभावाची पारख करतात आणि यानुसार स्वत:ला सादर करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतात. अशावेळी पालकांनी आपल्या भावनांचे समायोजन करायला हवे. कारण अनियंत्रित भावनांमुळे स्वत:वरील ताबा सुटण्याची शक्यता अधिक असते. त्याकरिता भावनांचे व्यवस्थापन अधिक गरजेचे आहे.

एकाचा राग दुसऱ्यावर : बऱ्याच वेळा आपल्या कामातील थकवा, त्रास, अपयशयाचा त्रागा आपल्या पाल्यावर काढताना अनेक पालक दिसतात. त्यांना आपली चिडचिड मोकळी करण्याकरिता आणि आपले निमुटपणे सहन करणार कोण? या विचारातून मुलांवर राग काढल्याचे दिसून येते. यालाच सर्वश्रुत भाषेत सांगायचे तर ‘वड्याचे तेल वांग्यावर’ असे म्हणता येईल.

इतरांशी तुलना : बिल्डींगमधील, सोसायटीमधील इतर मुलांशी आपल्या मुलांची तुलना करताना आणि त्यावरून मुलांवर चिडणारेही अनेक पालक आहेत. प्रत्येक मूल वेगळं असतं हा विचारच पालकांना पटत नसतो. इतर मुलांशी तुलना करून आपल्या मुलांवर सतत त्याचे शाब्दिक वर्णन करून आपल्या मुलाचे मानसिक खच्चीकरण पालकांकडून केले जाते.

स्पर्धेचा दबाव : आज जगाने खूप वेग घेतलाय आणि त्यात आपले मूल टिकले पाहिजे नव्हे पुढे पाहिजे या मानसिक दबावाखाली पालक स्वत: अधिक दिसून येतात. त्याची प्रतिक्रि या ही सतत मुलांसोबतच्या संवादात पालकांकडून होताना दिसून येते. मूल याबाबत खूप अनभिज्ञ असते. पालक मात्र आपला रेटा थांबवत नाहीत. अशात मुलाचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास नको ते होऊन बसते.

अपेक्षांचे ओझे : आपल्या मुलाने अमुकच करावे, तमुकच व्हावे यांसारखी स्वप्न पाहणे हे या मागील एक महत्त्वाचे कारण आहे. अपेक्षाभंगाची प्रतिक्रि या खूप तीव्र असते आणि मुले त्याचे बळी पडतात. मुलाची वास्तविकता न जाणता आपली स्वप्न त्यांच्यावर लादण्याच्या भूमिकेतून पालक असे वागताना अनेकदा दिसून येतात.

पालकप्रधानत्व
मी त्याचा पालक आहे आणि मी सांगेल तसेच मुलाने वागले पाहिजे, माझे ऐकले पाहिजे हा एक पालकप्रधानत्व प्रकार यात दिसून येतो. काहीवेळा पालक अधिक अतिसंवेदनशीलपणे मुलांसोबत वागताना दिसून येतात. त्यात पालकांचा संवाद हा अतिशय लडिवाळ आणि मुलांसोबत कसे वागावे हे फक्त त्यांनाच माहिती, या आवेशात ते मुलांसोबत व्यवहार करतात.
विशेषत: सार्वजनिक ठिकाणी त्याचा इतका अतिरेक होतो की मुलांना त्याचा अक्षरक्ष: वीट येतो. मुले आपली आगळीक अशी प्रतिक्रि या द्यायला सुरु वात करतात. हे पाहून मग पालकही वैतागतात आणि असे का झाले याचा विचार न करता तेही आपली नको ती प्रतिक्रि या देऊनच टाकतात.
थोडक्यात ही वरील सारी कारणे आणि पालकांचा व्यवहार पाहिल्यावर असे लक्षात येते की, आपल्या मुलांना शिस्त लागावी किंवा त्यांनी कसं वागावं या आग्रहापोटी स्वत: पालकांना आपल्या भावनांचं वहन कसं करावं? याबाबत ते खूपच गोंधळलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.
या अशा भावनांचं व्यवस्थापन कसं करावं आणि आपल्या पाल्यासोबत सुसंवाद कसा साधावा? मुलांच्या ‘स्व’स्वीकार कसा करावा? मुलांची स्पेस त्यांना कशी द्यावी? वास्तव जग आणि कल्पनेतलं जग याचा विचार कसा करावा? याचा विचार होणं ही आजच्या सुजाण पालकत्वाची खरी गरज आहे.
सायकल चालवायची असेल तर आधी सायकल चालवायला शिकायला लागते. स्वयंपाक करायचा असेल तर आधी स्वयंपाक शिकायला लागतो. सुजाण पालक होण्याकरिता सुजाण पालकत्व जाणून घ्यायला हवं. आपल्या मुलाला समजून घेताना मुलात मुल व्हांयला हवं आणि त्याला जाणायला हवं तरच तुम्ही खरे बाबा! ंअसे बाबा होण्याचा पालकांनी विचार करावा, बरं का रे बाबा!

Web Title: 'Babaji' is barely sure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.