बाबाजी पाटील यांचा राजीनामा मंजूर

By admin | Published: April 6, 2017 03:38 AM2017-04-06T03:38:03+5:302017-04-06T03:38:03+5:30

तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बहुजन विकास आघाडीने सत्ता काबीज केली

Babaji Patil's resignation granted | बाबाजी पाटील यांचा राजीनामा मंजूर

बाबाजी पाटील यांचा राजीनामा मंजूर

Next

ठाणे : तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बहुजन विकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. विद्यमान अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिलेला राजीनामा विशेष सभेत १९ पैकी १६ अशा बहुमतांनी मंजूर करण्यात आला. त्यानंतर, हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि भाजपाने एकत्र येऊन उपाध्यक्षा सुनीता दिनकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली आहेत.
जिल्हा बँकेच्या मे २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहकार पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्या ‘सहकार’ने ११, तर बहुजन विकास आघाडीसह शिवसेना राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या ‘लोकशाही सहकारने आठ, तर दोन जागा राष्ट्रवादीच्या बंडखोर अपक्षांनी जिंकल्या होत्या. लोकशाही सहकार पॅनलने एकत्र येऊन बाबाजी पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली होती.
दरम्यान, दोन वर्षांनंतर बहुजन विकास आघाडीने भाजपाशी जवळीक साधून संचालकांची जुळवाजुळव केली. त्यानंतर, अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याच्याही हालचाली सुरू झाल्या. त्यानुसार, ‘लोकशाही सहकार’ पॅनलचे संचालक शिवाजी शिंदे, विद्यमान उपाध्यक्षा सुनीता दिनकर, अनिल मुंबईकर, मधुकर पाटील, राजेश रघुनाथ पाटील आदी १७ संचालकांनी एकत्र येऊन ३० मार्च रोजी कोकण विभागाच्या सहनिबंधक ज्योती लाटकर यांच्याकडे अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. याची कुणकुण लागताच हा अविश्वास ठराव बँकेच्या सभेत चर्चेला येण्यापूर्वीच पाटील यांनी त्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याच राजीनाम्यावर चर्चा करण्यासाठी उपाध्यक्ष सुनीता दिनकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विशेष सभा आयोजिली होती. या सभेला १९ पैकी १६ संचालक उपस्थित होते. ‘संचालकांना विश्वासात न घेता काम करणे’ हा ठपका ठेवून सर्वच संचालकांनी हा राजीनामा मंजूर केला. विशेष म्हणजे ज्यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार होती, ते बाबाजी पाटील आणि सुभाष पवार हे दोन संचालक मात्र गैरहजर होते. (प्रतिनिधी)
>घटनादुरुस्तीनंतर बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा केला आहे. परंतु, दोन्ही पॅनलला समसमान मते असल्यामुळे पाच वर्षांत प्रत्येक पक्षाला संधी देण्याचा अंतर्गत ठराव होता. चांगले काम केल्यामुळे दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी दिल्यामुळे सर्व संचालक आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे आभार. स्वेच्छेने हा राजीनामा देत आहे.
- बाबाजी पाटील, माजी अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
>अजून अध्यक्षपदाचा निर्णय झालेला नाही. पण, हंगामी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेला प्रगतीपथावर नेण्याचे तसेच महिला बचत गट आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करणार आहे.
- सुनीता दिनकर, प्रभारी अध्यक्षा

Web Title: Babaji Patil's resignation granted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.