Babanrao Lonikar: बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, शिवीगाळ प्रकरणात ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:33 IST2022-03-30T21:32:41+5:302022-03-30T21:33:02+5:30
Babanrao Lonikar: नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Babanrao Lonikar: बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ, शिवीगाळ प्रकरणात ऊर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश
मुंबई: नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. शिवीगाळसोबतच आमदार लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
उर्जामंत्र्यांचे कारवाईचे आदेश
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 'या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश मी औरंगाबाद येथील महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत. ज्या अधिकाऱ्याला अशी धमकी मिळाली त्यांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल,' असे राऊत म्हणाले.
भाजपला लगावला टोला
'आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिपच्या बातम्यांची मी दखल घेतली आहे. अभियंत्यांसोबत केलेला संवाद हा धक्कादायक आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भुषविलेल्या एका ज्येष्ठ राजकीय नेत्याला ही भाषा नक्कीच शोभणारी नाही. स्वतःला संस्कारी म्हणवणा-या एका पक्षाचे 30 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या नेत्याच्या भाषेने या पक्षाच्या संस्काराचाही बुरखा या निमित्ताने फाटला आहे,' असा टोलाही राऊत यांनी लगावला.
'तो मी नव्हेच, माझ्या विरुद्ध षडयंत्र'
वीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.