"मराठा मतं बोटावर मोजण्याइतकी"; व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 11:45 AM2024-11-12T11:45:06+5:302024-11-12T11:49:38+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी मराठा मतांबद्दल केलेलं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. त्यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यावर लोणीकरांनी भूमिका स्पष्ट केली.
Babanrao Lonikar News: भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. त्यातील त्यांच्या एका विधानाची चर्चा होत आहे. मराठा समाजाची मतं कांड्यावर (बोटावर) मोजण्याइतकी आहेत, असं बबनराव लोणीकरांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान काही दिवसांवर आलेलं असताना व्हायरल झालेल्या या व्हिडीओने लोणीकरांची डोकेदुखी वाढवलीये. त्यावर त्यांनी आता खुलासाही केला आहे.
बबनराव लोणीकरांचं विधान काय?
"या गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची कांड्यावर (बोटावर) मोजण्याइतकी मते आहेत. मात्र, हे गाव सर्व समाजाचं गाव आहे आणि सर्व जाती-धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत. मराठा एक, धनगर आहेत. माळी आहेत. फुलारी आहेत. आगलावे आहेत. शेंडे आहेत. कांबळे आहेत. सगळे आहेत", असे लोणीकर म्हणाले.
लोणीकरांच्या या विधानातील मराठा समाजाची मते बोटावर मोजण्याइतकी आहेत, याची चर्चा सुरू झाली. मराठा आंदोलनाचं केंद्र असलेल्या मराठवाड्यातीलच एका मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या लोणीकरांनी यावर लगेच खुलासाही केला.
बबनराव लोणीकरांनी काय मांडली भूमिका?
व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले, "माझ्या भाषणात म्हणालो की, मराठा समाजाची मते या गावात कमी आहेत. हे गाव एससी, एसटी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, मुस्लीम, अल्पसंख्याक, अठरापगड जातीचं असणार हे गाव आहे. पण, ४० वर्षे या गावाने भाजपला मताधिक्य दिलेलं आहे."
"मराठा समाजाची ६०-७० टक्के मतं मला मिळतात. भाजपला मिळतात. पण, काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करून काही व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो खोटारडेपणा आहे. मतदारसंघात ४० वर्षे मराठा, माळी, मुस्लीम, एससी, एसटी, व्हिजेएनटी, ओबीसी, अठरापगड जातीचे लोक मला २५ हजारपेक्षा जास्त मतांनी मला का निवडून देतात? तर माझं काम आहे", असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.