राहुल जगतापांसमोर पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 02:26 PM2019-07-13T14:26:05+5:302019-07-13T14:31:19+5:30
जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच २०१४ मध्ये सर्वात तरुण आमदार ठरलेले श्रीगोंदायाचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्यापुढे पुन्हा भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुतेंच आवाहन असणार आहे. मागच्यावेळी तब्बल १३ हजार मतांनी नवख्या जगताप यांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. त्यामुळे हा विजय २०१९ मध्ये जगताप कायम ठेवणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.
२०१४ मध्ये अवघ्या २५ व्या वर्षी आमदार झालेले राहुल जगताप यांना श्रीगोंदा मतदारसंघातून पुन्हा बबनराव पाचपुतेंचा सामना करावा लागणार आहे. मोदी लाटेत सुद्धा जगताप यांनी ९९ हजार २८१ मतं मिळवत १३ हजार मतांनी पाचपुतेंना पराभूत केले होते. मात्र या पाच वर्षात पाचपुतेनी मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे. त्यामुळे जगताप यांना यावेळी पाचपुतेंच मोठे आव्हान असणार आहे.
जानेवारी महिन्यात झालेल्या नगरपरिषदेची निवडणुक बबनराव पाचपुते आणि राहुल जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत जरी नगराध्यक्षपदी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या शुभांगी पोते विजयी झाल्या असल्या तरीही, १८ पैकी ११ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यातच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून कमळ हातात घेतल्याने त्याचा फायदा सुद्धा पाचपुते यांना होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत यावेळी जगताप आणि पाचपुते यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्यची चर्चा आहे.