बाबांच्या हट्टापायी आघाडीचे घोडे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 02:13 AM2016-10-27T02:13:38+5:302016-10-27T02:13:38+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
- अतुल कुलकर्णी, मुंबई
स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसला मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धरल्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे घोडे अडले आहे.
बुधवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत, सहापैकी काँग्रेसला दोन जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली असल्याची माहिती आहे.
मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन जागांचा आग्रह कायम ठेवला असून, त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळविल्याने, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा नाईलाज झाल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही काँग्रेसला आघाडी हवीच आहे. मात्र, राष्ट्रवादी आपल्या पाच जागांवरील दावा सोडायला तयार नाही.
सांगली-सातारा (प्रभाकर घार्गे), यवतमाळ (संदीप बाजोरिया), भंडारा-गोंदिया (राजेंद्र जैन), पुणे (अनिल भोसले) या पाच जागी राष्ट्रवादीचे, तर नांदेड येथे काँग्रेसचे अमर राजूरकर विद्यमान आमदार आहेत. जळगावला भाजपाचे गुरुमुख जगवानी आमदार आहेत. सहापैैकी नांदेड आणि यवतमाळची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीने यवतमाळची जागा काँग्रेसला सोडली, तर आ. बाजोरिया स्वत:च्या भावाला उभे करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून अद्याप अंतिम प्रस्ताव आलेला नाही, तो आल्यानंतर कोणाला कोणती उमेदवारी द्यायची ते ठरवू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी सांगितले.