बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे नेते नाहीत - मोदी
By admin | Published: October 11, 2015 06:55 PM2015-10-11T18:55:03+5:302015-10-11T20:08:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. आंबेडकर नसते तर आज मोदीही नसते असे भावनिक विधानही त्यांनी केले आहे.
मुंबईत इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक व मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजनानंतर बीकेसीतील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेतली. आज जगाला मार्टिन लूथरकिंग माहित आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगाला माहित नाही हे आपलेच दुर्दैव आहे. बाबासाहेब अत्यंत कठीण स्थितीतून पुढे आले पण त्यांच्यात कटुता कधीही नव्हती असे मोदींनी सांगितले. कोणाला कधी भारतरत्न मिळाले हे सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही, ज्यांनी संविधान तयार केले अशा आंबेडकर यांचे तैलचित्र संसदेत लावण्यास तत्कालिन सरकार तयार नव्हते असे सूचक विधान करत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
स्मारकात लोकसहभाग हवा
इंदू मिलमधील आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोकसहभाग असायला हवा. महाराष्ट्रात ४० हजार गाव आहेत, या प्रत्येक गावाने स्मारकाच्या परिसरात एक रोपटं लावावे आणि ११ हजार रुपये द्यावे असे आवाहन मोदींनी केले आहे. यामुळे स्मारकाचे चित्रच बदलेल असे त्यांनी सांगितले.
गडकरी, फडणवीस आणि प्रभूंचे कौतुक
बीकेसीतील सभेत मोदींनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या तिघांचे भरभरुन कौतुक केले. बंदरांच्या विकासात गेल्या १० वर्षात सरकारने जे केले नाही ते गडकरींनी १५ महिन्यात करुन दाखवले. गडकरी हे वेगावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या प्रतिदिन १५ किलोमीटरचे रस्ते तयार होतात असा दावा मोदींनी केला. तर मेट्रो प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे काम फडणवीस यांनी चार महिन्यांत पूर्ण केले. तसेच जलयुक्त शिवार योजनेसाठीही त्यांचे कौतुक केले पाहिजे असे मोदींनी नमूद केले. सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे कामकाजही चांगले सुरु आहे असे सांगत मोदींनी प्रभूंचेही कौतुक केले.
आमच्याविरोधात भीती पसरवणं बंद करा
देशात भाजपाची सत्ता आली की आरक्षणाविरोधात भीती पसरवली जाते. भाजपा आली म्हणजे आरक्षण जाणार अशी भीती समाजाला दाखवली जाते. ही खोटी माहिती पसरवून राजकारण करण्याचे उद्योग बंद झाले पाहिजे असे मोदींनी विरोधकांना सुनावले आहे.