असा घडला महामानवाचा दीक्षाभूमीवरील पुतळा, ५९ वर्षांपासून लाखो अनुयायी होतात नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:22 AM2022-04-13T07:22:11+5:302022-04-13T07:26:45+5:30

वंचितांच्या उत्थानाचा सम्यक मार्ग दाखविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक देखणा पुतळा दीक्षाभूमीवर उभारण्याचे ठरले

babasaheb ambedkar statue history dikshabhumi | असा घडला महामानवाचा दीक्षाभूमीवरील पुतळा, ५९ वर्षांपासून लाखो अनुयायी होतात नतमस्तक

असा घडला महामानवाचा दीक्षाभूमीवरील पुतळा, ५९ वर्षांपासून लाखो अनुयायी होतात नतमस्तक

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : वंचितांच्या उत्थानाचा सम्यक मार्ग दाखविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक देखणा पुतळा दीक्षाभूमीवर उभारण्याचे ठरले. पुतळा बाबासाहेबांचा होता, त्यामुळे दर्जाशी तडजोडीचा प्रश्नच नव्हता. या प्रज्ञावंताच्या विद्वत्तेचे तेज पुतळ्याच्या सर्वांगातून झळकणे अपेक्षित होते. मूर्तिकाराची शोधाशोध सुरू झाली आणि अखेर लष्करीबाग वस्तीतील शिल्पकार संतोष मोतीराव पराये यांचे नाव समोर आले. 

पराये यांनीही कठोर साधनेने त्यांचा पुतळा साकारला. तोच पुतळा ५९ वर्षांपासून कोट्यवधी अनुयायांना सामाजिक प्रतिक्रांतीची अविरत प्रेरणा देतोय. दीक्षाभूमीवर जगभरातून अनुयायी येतात आणि याच पुतळ्यासमोर नतमस्तक होतात.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांच्या अथक परिश्रमातून १३ एप्रिल १९५७ रोजी दीक्षाभूमीवर पहिली तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन झाली. याच ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभारला जावा, याची हुरहुरही आवळे यांना लागली होती. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली. 

बाबासाहेबांचा चांगला पुतळा बनविणारा कुणी आहे का, असा प्रश्न विचारला. उपस्थितांनी वेगवेगळी नावे सुचविली. एक नाव चितार ओळीतील संतोष मोतीराव पराये यांचे आले. बाबू आवळे कार्यकर्त्यांसह पराये यांच्याकडे गेले आणि त्यांना पुतळा घडवण्याची विनंती केली. 

पुतळा बघायला लोकांच्या झुंडी
बाबासाहेबांचा पुतळा बनविण्यासाठी लष्करीबागेतील ‘हाडके भवन’ येथील जागेची निवड करण्यात आली. पुतळा बनण्यास सुरुवात झाली तेव्हा अनुयायांची गर्दी व्हायची. पुतळा जेव्हा पूर्णत्वास आला तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी हाडके भवनाकडे धाव घेत होत्या.

...अन् मूर्तिकार ढसाढसा रडले
काही म्हणायचे, बाबासाहेबांचा गाल मोठा वाटतो. काही म्हणायचे, कान मोठे वाटतात. धोंडबाजी मेढे गुरुजी (कारागीर) यांनी पुतळ्याच्या गालाला सिमेंट लावले. अर्ध्या तासाने मूर्तिकार पराये आले. गालाला सिमेंट माखलेले पाहून ते फारच नाराज झाले आणि ढसाढसा रडू लागले. तेव्हा बाबू आवळे यांनी त्यांची माफी मागितली. बाबूंच्या शब्दाला मान देऊन पराये नव्या जोमाने पुतळा बनविण्यास लागले. 

पुतळ्याची निघाली विशाल मिरवणूक 
६ डिसेंबर १९६३ रोजी पुतळ्याच्या अनावरणाचा दिवस ठरला. दुपारी २ वाजता साडेपाच फूट उंचीच्या भव्य व आकर्षक अर्धपुतळ्याची विशाल मिरवणूक कर्मवीर दादासाहेब गायकवाड व रावबहादूर एन. शिवराज यांच्या उपस्थितीत बाबू आवळे यांच्या नेतृत्वात निघाली. सायंकाळी मेणबत्तीच्या प्रकाशात दीक्षाभूमीवर मिरवणूक पोहोचली. पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता लाखो अनुयायी आले होते.
 

Web Title: babasaheb ambedkar statue history dikshabhumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.