रायगडावर छत्रपतींच्या समाधीजवळ संशयास्पद हालचाली; २ जण ताब्यात, शिवप्रेमी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 05:52 AM2021-12-10T05:52:31+5:302021-12-10T05:53:10+5:30
रायगडावरील ‘त्या’ संशयित व्यक्ती पाेलिसांच्या ताब्यात, अस्थीमिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगडावरील समाधीला राख मिश्रित लेप लावणे आणि पुस्तकाचे पूजन करणाऱ्या दाेन व्यक्तींना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा जबाब नाेंदवण्यात आला आहे, तसेच सापडलेले साहित्य रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. अस्थीमिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
किल्ले रायगडावर बुधवारी (८ डिसेंबर) दुपारी पुण्याहून काही जण आले हाेते. शिवप्रेमींना जगदीश्वर मंदिराजवळच्या चौथऱ्यावर काही व्यक्तींच्या हालचाली या संशयास्पद असल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी या संशयास्पद व्यक्तींचा पाठलाग केला. चार ते पाच व्यक्ती या जगदीश्वर मंदिराजवळच्या चौथऱ्यावर मंत्रोच्चार करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला लेप लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आराेप त्यांनी केला.
याठिकाणी पुस्तकाचे पूजनदेखील करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्यांना शिवप्रेमींनी रोखले होते. गडावर काही काळ तणावाचे वातावरण हाेते. त्यानंतर पाेलिसांना पाचारण करण्यात आले. असे काेणतेही कृत्य करण्यात आले नसल्याचे संबंधित संशयित व्यक्तींनी पाेलिसांना सांगितले. संशयित व्यक्तींचे महाड येथील तालुका पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडील राखमिश्रित लेप ताब्यात घेऊन रासायनिक विश्लेषण करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आहे. दरम्यान, संशयित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केलेला नाही, असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना
सांगितले.