‘यूएन’च्या मुख्यालयात बाबासाहेबांची जयंती
By admin | Published: April 2, 2016 01:34 AM2016-04-02T01:34:32+5:302016-04-02T01:34:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) मुख्यालयात साजरी होणार आहे. कल्पना सरोज फाउंडेशन, फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन आणि परमनंट
मुुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) मुख्यालयात साजरी होणार आहे. कल्पना सरोज फाउंडेशन, फाउंडेशन फॉर ह्युमन होरायझन आणि परमनंट मिशन आॅफ इंडिया टू युनायटेड नेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने या ऐतिहासिक जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. कल्पना सरोज फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना सरोज यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीमुळे प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७० वर्षांच्या इतिहासात त्यांच्या न्यू यॉर्क येथील मुख्यालयात आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी होणार असल्याचे सरोज यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात कोणत्याही महापुरुषाची जयंती साजरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात पहाट असताना अमेरिकन कालगणनेनुसार १३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात देदीप्यमान जयंती सोहळा सुरू असेल.
कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांचा भव्य पुतळा संयुक्त राष्ट्रसंघामधील भारताच्या कायमस्वरूपातील सदस्यांकडे सुपुर्द केला जाईल. या वेळी संयुक्त राष्ट्रसंघातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर जगातील वंचित घटकांसाठी अव्याहतपणे काम करणाऱ्या विविध क्षेत्रांतील १२५ व्यक्तींना ‘आंबेडकर रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल, असेही सरोज यांनी सांगितले. देशातील सामाजिक न्याय विभागाचे काही अधिकारी आणि काही निवृत्त सनदी अधिकारी या वेळी उपस्थित असतील, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार
न्यू यॉर्कमध्ये कोलंबिया विद्यापीठातून
‘दि इव्होल्युशन आॅफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ या विषयावर बाबासाहेबांनी डॉक्टरेट पदवी मिळवली होती.
त्याच न्यू यॉर्कमध्ये भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचा मानसही सरोज यांनी व्यक्त केला.