बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:36 AM2024-07-03T06:36:31+5:302024-07-03T10:01:10+5:30

राज्यात उद्योगांचा जो विकास झाला त्यात त्यांचे योगदान होते. त्यांनी स्वतंत्र विचाराने पत्रकारिता केली असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

Babu ji was the voice of the common man, kept the values of journalism by being committed to the ideas -  Vijay Darda | बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा

बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा

मुंबई - बाबूजी जवाहरलालजी दर्डा हे स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी पर्व होते आणि  स्वातंत्र्यानंतर दिल्ली, महाराष्ट्राच्या सत्ता दरबारात ते सामान्यांचा आवाज बनले. सत्तेत असताना कोणतीही भीती न बाळगता ते याच आवाजाशी बांधील राहिले आणि त्याच विचारांनी त्यांनी पत्रकारितेची मूल्ये जपली, असे गौरवोद्गार लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी काढले. 

ते म्हणाले की, बाबूजी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. ते स्वातंत्र्यसैनिक होतेच, पण कृषितज्ज्ञही होते. त्यांना विकासाचा ध्यास होता. त्यांनी राज्याला त्या काळी औद्योगिक धोरण दिले. ते सव्यसाची संपादक होते. पत्रकारिता परमोधर्म हे ब्रीदवाक्य समोर ठेवून त्यांनी वाटचाल केली. ते आपल्यासोबत काम करणाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य देत असत. ते राज्याचे आरोग्य मंत्री होते आणि त्यावेळी त्यांच्याच खात्याविरोधात ‘लोकमत’मध्ये राही भिडे यांनी मालिका छापली. तेव्हा, राही! आपण आपले काम सुरू ठेवा, मी मंत्री आहे म्हणून दडपण ठेवून लिहू नका, असे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले होते. माझे बंधू राजेंद्रबाबू हे राज्याचे उद्योग मंत्री, शिक्षण मंत्री होते, पण तेव्हा ‘लोकमत’ने त्यांनाही सोडले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी बाबूजींच्या १०१ व्या जयंतीनिमित्त शंभर रुपयांचे विशेष नाणे लोकार्पण करण्याची संधी आम्हाला दिली याबद्दल कृतज्ञ आहोत. 

इंदिराजींना विनोबा भावेंकडे नेणारे बाबूजी 

इंदिरा गांधी दिल्लीहून नागपूरला आल्या. त्यांना खुल्या जीपमधून विनोबा भावे यांच्याकडे नेणारे बाबूजी ऊर्फ जवाहरलालजी दर्डा मला आजही आठवतात. मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हा २५ वर्षांचा होतो आणि बाबूजी ६० वर्षांचे..! त्यांच्या अनुभवाचा मला खूप लाभ झाला. ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. दूरदृष्टी ठेवून प्रेमळपणाने निर्णय कसे घेतले जातात हे मी त्यांच्याकडून शिकलो, अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी आठवणींचा पेटारा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यावर केंद्र सरकारने काढलेल्या नाण्याचे विमोचनप्रसंगी उघडला.

मजबूत लोकशाहीसाठी लोकमताचा आदर करून निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे झाले तर सामान्य माणसाचा आवाज मजबूत होतो आणि त्यांना न्यायही मिळतो. हे काम बाबूजींच्या लोकमतने कायम ठेवले आहे. सर्वसामान्यांचा आवाज लोकमत आहे हे मी वयाच्या २५ व्या वर्षांपासून पाहत आलो आहे. त्यांनी लोकमतच्या माध्यमातून समाज जागृती केली. लोकशाहीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवला की, लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतात, असेही वासनिक म्हणाले. 

बाबूजींनी व्यापक हिताचा विचार केला 

सामाजिक सौहार्द राहावे, समाजमन विकासाभिमुख व्हावे आणि लहान-मोठ्या वादांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे व्यापक हित साधण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे ही भावना ज्या पिढीने रुजविली त्या पिढीतील धुरिणांपैकी बाबूजी एक होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले होते. अशा महान नेत्याच्या स्मरणार्थ शंभर रुपयांचे नाणे निघावे हे त्यांच्याप्रतीच्या सन्मानाचे द्योतक आहे. - राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

राज्याच्या उद्योग विकासात योगदान 

मी प्रथम वर्ष १९८५ मध्ये आमदार झालो तेव्हा सभागृहातील सर्वांत तरुण आमदार होतो. त्यावेळी बाबूजी मंत्रिमंडळात होते. त्यांच्याकडे काही काम घेऊन गेल्यानंतर अत्यंत जिव्हाळ्याच्या नात्याने ते संवाद साधायचे, कौतुकाने दोन शब्द बोलायचे. सगळ्यांना मदत करण्याची त्यांची भावना असायची. राज्यात उद्योगांचा जो विकास झाला त्यात त्यांचे योगदान होते. त्यांनी स्वतंत्र विचाराने पत्रकारिता केली. - बाळासाहेब थोरात,
विधिमंडळ पक्षनेते, काँग्रेस

बाबूजींचा विचार आजही मार्गदर्शक   

स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राची जडणघडण अशा दोन्हींमध्ये योगदान देणारे जे नेते होऊन गेले त्यात बाबूजी जवाहरलाल दर्डा यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. काँग्रेसची निष्ठा त्यांनी हयातभर जपली; पण त्याचवेळी अन्य राजकीय विचारांच्या धुरिणांशी त्यांनी मैत्र तेवढ्याच आपुलकीने जपले. नेत्यांची ती पिढीच वेगळी होती.  राज्याच्या व्यापक हिताचा त्यांचा विचार आजही मार्गदर्शक असाच आहे. - मंगलप्रभात लोढा, कौशल्यविकास मंत्री, महाराष्ट्र.

बाबूजी जयंती सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आ.आशिष शेलार, आ.प्रवीण दरेकर, माजी मंत्री अनिल देशमुख, आ.सचिन अहिर, आ.प्रसाद लाड, आ. विश्वजित कदम, आ. विकास ठाकरे, आ. किशोर जोरगेवार, पंजाबचे विरोधीपक्षनेते आ. फत्तेसिंग बाजवा, आ. अभिजित वंजारी, आ. विक्रम काळे, माजी खा. विकास महात्मे, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर, माजी मंत्री सुरेश शेट्टी, रेमंडचे अध्यक्ष गौतम हरि सिंघानिया, यूपीएलचे जय श्रॉफ, अंजता फार्माचे अध्यक्ष मधुसुदन अगरवाल

अजंता फार्माचे व्यवस्थापकीय संचालक योगेश अगरवाल, केकेआर टीम व रेड चिलीजचे सीईओ वेंकी मैसूर जय कॉर्पचे आनंद जैन, विकासक सुभाष रुणवाल व सुबोध रुणवाल, कॅटर्टन पार्टनर्सचे संजीव मेहता व मोना मेहता, अहमदाबादचे विकासक संजय ठक्कर, आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर, सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व मिलिंद म्हैसकर, माजी सनदी अधिकारी संजय भाटिया व अनुराधा भाटिया, एसीबीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रवीण दराडे, आयएफएस डॉ. राजेश गवांदे,

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, माजी कॅबिनेट सचिव व्ही. बालाकृष्णन, माजी सनदी अधिकारी सुरेश काकाणी, आयपीएस अधिकारी यशस्वी यादव, माजी आयपीएस अधिकारी पी.के.जैन, अँडव्होकेट सतीश मानेशिंदे, बॉम्बे हॉस्पिटलच्या न्यूरो सर्जन डॉ. केकी तुरेल, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, रहेजा ग्रुपचे विजय रहेजा व गुरलिन रहेजा, जितो नागपूरचे सचिव राजन ढढ्ढा, गायक रुपकुमार राठोड व सुनाली राठोड, कवी आणि अभिनेते शैलेश लोढा,

स्मिटल जेम्सचे अध्यक्ष किरीट भन्साळी, ब्राईट आऊटडोअरचे अध्यक्ष योगेश लखानी, डॉ. संजय कपोते, महाराष्ट्र पाणी नियामक आयोगाच्या डॉ. साधना महाशब्दे, सिग्नसचे अशोक शाह, जयेन्द्र शाह, संदीप शाह, बिझनेसमन केतन गोरानिया, आरबीआयचे संचालक आशुतोष रारावीरकर, इन्स्पिरा ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश जैन, अर्थतज्ज्ञ श्वेताली ठाकरे, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे किशोर दर्डा, अमोलकचंद महाविद्यालयाचे ट्रस्टी डॉ. ललित निमोदिया, यवतमाळचे सीए प्रकाश चोपडा, विलास देशपांडे, मनोज रायचुरा, नागपूर काँग्रेसचे अतुल कोटेचा, माजी आ.अतुल शाह, चित्रकार कमल जैन, सरपंच परिषदचे जयंत पाटील, जेएसडब्ल्यू स्टीलचे प्रशांत जैन, 

रेमंडचे संजय सरीन, रेमंडचे अनुप पराशर, रेमंडचे चंद्रकांत गुप्ता, पुणे कॉँग्रेसचे अक्षय जैन, उद्योजक विजय कलंत्री, एसकेए ॲडव्हायजर्स प्रा. लि. अध्यक्ष सुनील अलग, अभिनेत्री अंजली पाटील, उद्योजक विकास कनोई, संभाजीनगर जिल्हा कॉँग्रेसचे शेख युसुफ, डॉ. जफर खान, कॉँग्रेसचे  मुजिद पठाण, कॉँग्रेसचे उमाकांत अग्निहोत्री, ज्येष्ठ पत्रकार  मधुकर भावे व राही भिडे, नेटवर्क १८-लोकमतचे संपादक आशुतोष पाटील.

Web Title: Babu ji was the voice of the common man, kept the values of journalism by being committed to the ideas -  Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.