मुंबईतील दाम्पत्याने खरेदी केले बाळ
By admin | Published: April 21, 2016 04:57 AM2016-04-21T04:57:16+5:302016-04-21T04:57:16+5:30
मुंबईतील एका जोडप्याने नांदेडाच्या सिडको भागातील सुनीता बालगृहातून दहा दिवसांचे एक बाळ १ लाख ८० हजार रुपयांत विकत घेतल्याचा प्रकार तब्बल दोन वर्षानंतर उघडकीस आला आहे
नांदेड : मुंबईतील एका जोडप्याने नांदेडाच्या सिडको भागातील सुनीता बालगृहातून दहा दिवसांचे एक बाळ १ लाख ८० हजार रुपयांत विकत घेतल्याचा प्रकार तब्बल दोन वर्षानंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बालगृहाच्या संचालिका, मूल खरेदी करणारे
जोडपे आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या दोन कुटुंबियांना अटक
केली आहे़ बुधवारी पोलिसांनी बालगृहाची झडती घेतली. रेकॉर्डपेक्षा एक बाळ जास्त आढळून आल्याने बालगृहाचे सर्व रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या ताडदेव येथील एका दाम्पत्याला विवाहानंतर अनेक वर्षांनंी अपत्य झाले नव्हते़ उपचारानंतरही हे दाम्पत्य अपत्य सुखासाठी आसुसले होते़ बाळासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी होती़
त्यात नांदेडच्या सिडको भागातील सुनीता बालगृहाचा पत्ता त्यांना मिळाला़ त्यानंतर त्यांनी मुंबईहून थेट नांदेड गाठले़ त्यावेळी सुनीता बालगृहाच्या संचालिका सत्यश्री गुट्टे होत्या़ आॅगस्ट २०१४ मध्ये दाम्पत्याने संचालिका गुट्टे यांची भेट घेतली़
तेव्हा त्यांनी बाळ दत्तक घेण्यासाठी बरेच सोपस्कार पूर्ण करावे लागत असून त्यासाठी खूप वेळ जात असल्याचे कारण सांगितले़ त्याऐवजी १ लाख ८० हजार रुपये द्या आणि मूल घेवून जा, असा प्रस्ताव ठेवला़ त्या दाम्पत्यानेही हा प्रस्ताव मान्य केला़ त्यासाठी बहीण आणि मेव्हण्याकडून आर्थिक मदत घेवून दहा दिवसांचे बाळ विकत घेतल़े परंतु या
घटनेनंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबई पोलिसांना आलेल्या एका निनावी पत्रामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला़
मुंबईच्या समाजसेवा शाखेकडून या प्रकरणाची शहानिशा झाल्यानंतर मूल विकत घेणाऱ्या दाम्पत्याला
प्रथम अटक करण्यात आली़
त्यानंतर १८ एप्रिल २०१६ रोजी नांदेडातून संचालिका सत्यश्री
गुट्टे यांना बेड्या ठोकल्या़ दाम्पत्याला आर्थिक मदत करणाऱ्या
कुटुंबियांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)