भररस्त्यात दिला बाळाला जन्म
By admin | Published: February 12, 2017 02:26 AM2017-02-12T02:26:55+5:302017-02-12T02:26:55+5:30
विक्रोळीतील एका कामगार महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्याने जवळच असलेल्या प्रसूतीगृहाकडे धाव घेतली. मात्र ते बंद असल्याने दुसऱ्या रुग्णालयाची वाट शोधत असताना
मुंबई : विक्रोळीतील एका कामगार महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्याने जवळच असलेल्या प्रसूतीगृहाकडे धाव घेतली. मात्र ते बंद असल्याने दुसऱ्या रुग्णालयाची वाट शोधत असताना असह्य वेदनांनी अश्रू अनावर होऊन तिला रस्त्यातच बसावे लागण्याची धक्कादायक घटना विक्रोळीत शनिवारी घडली.
त्याचदरम्यान तेथून जाणाऱ्या प्रचारफेरीतील महिला कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवून या महिलेकडे धाव घेतली आणि महिलेची प्रसूती करून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले.
विक्रोळीसारखा गजबजलेला परिसर. वेळ दुपारी साडेबाराची. विक्रोळी टागोर नगर परिसरात राजकीय पक्षाची प्रचार रॅली सुरू होती. प्रचाराच्या घोषणाबाजीत एका कार्यकर्ता महिलेच्या कानावर रस्त्याच्या बाजूने रडण्याचा आवाज आला. तिच्याकडे धाव घेताच प्रसूतीकळांमुळे या महिलेने रस्त्यात बसल्याचे सांगितले. तसेच बाळ अर्धे बाहेर आले असल्याचे तिने सांगितले.’ ही विचारपूस झाल्यानंतर प्रचारफेरीतील कार्यकर्त्या मधुरा जोशी, श्रद्धा रुके, वासंती शिंदे यांनी प्रचार बाजूला सोडून तिच्याभोवती साडीच्या पदराने आडोसा तयार केला आणि प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर तत्काळ १०८ रुग्णवाहिका बोलावून घेतली.
रुग्णवाहिका तेथे दाखल होताच तेथील डॉक्टरांच्या मदतीने भररस्त्यात या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली आणि बाळाला व आईला रुग्णवाहिकेने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. (प्रतिनिधी)
वेदनांमुळे रस्त्यातच बसावे लागले
प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आशा पवार असे असून, ती टागोरनगर परिसरात राहते. याच परिसरातील इमारतींमध्ये ती सफाई कामगार म्हणून काम करते. कामादरम्यान वेदना वाढल्याने तिने पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतीगृहाकडे धाव घेतली.
मात्र पालिकेचे हे रुग्णालय बंद असल्यामुळे तिला रस्त्यातच बसावे लागले. वेदनांमुळे जवळचे अन्य पालिका रुग्णालय तिच्या नजरेत पडले नाही.