आजी-आजोबा 'बेबी सीटिंग'साठी नाहीत; कोर्टाकडून पालकांची कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 09:19 AM2018-05-22T09:19:24+5:302018-05-22T09:19:39+5:30
मुलं सांभाळणं ही आजी-आजोबांची जबाबदारी नाही, अशा निर्णय पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे. पालक कामानिमित्त बाहेर जात असले म्हणजे आजी-आजोबा बेबी सीटर होत नाहीत.
पुणे- मुलं सांभाळणं ही आजी-आजोबांची जबाबदारी नाही, अशा निर्णय पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं दिला आहे. पालक कामानिमित्त बाहेर जात असले म्हणजे आजी-आजोबा बेबी सीटर होत नाहीत. त्यामुळे मुलं सांभाळण्याची जबाबदार त्यांच्यावर टाकता येणार नाही, असं पुण्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं म्हटलं आहे.
मुलांना सांभाळण्याची प्राथमिक जबाबदारी ही आजी-आजोबांची नव्हे, तर आई-वडिलांची असते. आजी-आजोबा फक्त त्यांना मुलं सांभाळण्यास मदत करू शकतात. आजी-आजोबा मुलांचं संगोपन करताना मार्गदर्शन करण्यास मदत करू शकतात. परंतु त्यांना त्यांच्यावर मुलं सांभाळण्याची जोरजबरदस्ती करता येणार नाही. तसेच मुलांची जबाबदारी टाकून आजी-आजोबांच्या खासगी आयुष्यात व्यत्यय आणता येणार नाही, असाही निर्वाळा न्यायालयानं दिला आहे. पुण्यातल्या एका महिलेनं दोन मुलांना देखभाल खर्च मिळावा, यासाठी तिने याचिका केली होती. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.
एका 40 वर्षांच्या विवाहित महिलेनं पती दोन मुलांचा आणि तिचा सांभाळ करत नसल्यानं 2012मध्ये कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. तिची दोन्ही मुलं अल्पवयीन आहेत. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर पतीनं आमची देखभाल करणं बंद केलं. तसेच सासू-सासरेही दुस-या मुलांकडे राहण्यास गेले. त्यावेळी न्यायालयात तिनं यासंदर्भात दाद मागितली, तेव्हा न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.