मित्रपक्षानं महायुतीची साथ सोडली; विधानसभेला स्वबळावर २० जागा लढण्याची घोषणा
By कमलेश वानखेडे | Published: June 12, 2024 08:26 PM2024-06-12T20:26:16+5:302024-06-12T20:27:37+5:30
बच्चू कडुंचा महायुतीवर प्रहार, २० जागा लढणार., आज पदाधिकाऱ्यांची बैठक, महायुतीतील फुटीचे कारण दोन दिवसात सांगणार
नागपूर - लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची साथ सोडत वेगळी चुल मांडणारे बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठीही ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली असून तीत २० जागा लढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकसभेत बच्चू कडू यांना सोबत का घेतले नाही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाची मी वाट पाहिली नाही. एनडीएकडून एक एक पाऊल पडत आहे. ते माझ्या सोईचे पडत आहे. आम्ही सोबत राहून त्यांना मदत केली. पण एका वर्षात त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले, असे सांगत त्यांनी महायुतीबद्दल नाराजी व्यक्त केली. फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्या, मी सगळ सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघाची भूमिका महत्वाची
संघाची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. त्यांनी नैतिकता सोडली नाही. त्याचेच फटके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखविले आहे. अमरावतीमध्ये राणाला मदत करू नका तसे तर पत्र काढले आणि त्याचा परिणाम ही भोगावा लागला, असे सांगत संघाचा भूमिकेला कडू यांनी एकप्रकारे समर्थन दिले.
जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांची समाजाला गरज आहे. त्यांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणावे, त्यासाठी तयारीला लागावे. त्यांनी आता आंदोलन करू नये, उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती कडू यांनी केली. मी आता कुठेच मध्यस्थी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.