एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल पण पवारांच्या मनात काय, हे सांगता येणार नाही; राज्यसभेवरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 09:13 AM2022-06-12T09:13:02+5:302022-06-12T09:20:39+5:30
Bacchu Kadu On Rajya Sabha Election Result: जसा तुमच्या पक्षाच्या आमदारांवर दबाव आहे तसाच अपक्षांवरही असू शकतो. घोडेबाजार किंवा ईडी, सीबीआय काहीही. यामुळे कोणालाही पराभवासाठी जबाबदार ठरविण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला हवे, असे कडू म्हणाले.
शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत भाजपाने धूळ चारली आणि पुरती नाचक्की झाली. छत्रपती संभाजीराजेंवरून सुरु झालेले राजकारण अखेर १० जून रोजी मध्यरात्रीनंतर संपले. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उभा केलेला उमेदवार पडला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून सुरु झाले ते आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण. काठावर पास झालेल्या संजय राऊतांनी अपक्ष आमदारांची नावे घेत त्यांच्यावर पराभवाचे खापर फोडले. यावर ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी राऊतांसह महाविकास आघाडीतील पक्षांवर खापर फोडले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने आपापल्या उमेदवारांना जास्तीची मते टाकून सुरक्षित करण्याच्या नादात मविआचा गेम बिघडवला त्यामुळे हा पराभव झाला. सरसकट अपक्षांना बदनाम करून चालणार नाही. काही अपक्ष मविआसोबतच होते, असे सुनावत अमरावती जिल्ह्यातील एक अपक्ष आमदार जो सरकारसोबत आहे, तो या घोडेबाजारात सहभागी होता, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.
मविआला सहाव्या जागेसाठी आठ ते नऊ मते कमी पडली. संजय राऊतांसाठी ४१ मतांची बेगमी करून शिवसेनेने रिस्क घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने तसे केले नाही. तसेच ज्या आमदारांचे सदस्यत्व काम आहे, त्यांना तुरुंगात असल्याने मतदानाचा अधिकार नाही हा न्यायालयाचा निकाल अनाकलनीय आहे, असा आरोपही त्यांनी केला.
जसा तुमच्या पक्षाच्या आमदारांवर दबाव आहे तसाच अपक्षांवरही असू शकतो. घोडेबाजार किंवा ईडी, सीबीआय काहीही. यामुळे कोणालाही पराभवासाठी जबाबदार ठरविण्यापेक्षा त्यांना समजून घ्यायला हवे. पक्षांनी रिस्क घेतली असता तर आज चित्र वेगळे असले असते. विधान परिषदेत हे चित्र बदलू शकते, असे सांगतानाच एकवेळ समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे, हे सांगता येणार नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कौतुकामध्ये एक वेगळा डाव असू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.