“मोदींमुळे मंदिर-मशिदीचा प्रश्न सुटला, गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 11:00 AM2022-05-29T11:00:16+5:302022-05-29T11:00:55+5:30
महागाईने कळस गाठला आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकारला त्याचे काही घेणे देणे नाही, अशी टीका महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी केली आहे.
संग्रामपूर: देशात आताच्या घडीला मंदिर, मशिदीसह महागाई, बेरोजगारी, इंधनदरवाढ यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडताना दिसत आहेत. विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधत असून, भाजपही त्यांना प्रत्युत्तर देत आहे. यातच आता महाविकास आघाडीतील एका नेत्याने केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. नितीन गडकरी पंतप्रधान असते, तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता, असे विधान या नेत्याने केल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
नितीन गडकरी नेहमीच बेधडक विधाने आणि चोख कामासाठी ओळखले जातात. आपल्या भाषणांमध्ये राजकारणापेक्षा विकासकामांवर जास्त भाष्य करणारे नितीन गडकरी यांनी अनेकदा भाजपलाही खडे बोल सुनावले आहेत. कोणत्याही प्रकल्पाची आकडेवारी नितीन गडकरी यांना तोंडपाठ असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मोदी सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ते ओळखले जातात. यामुळेच अनेकदा गडकरी पंतप्रधान व्हावेत असे सर्वसामान्यांसह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना वाटत असते आणि ते अनेकदा बोलूनही दाखवले जाते. महाविकास आघाडीतील मंत्री बच्चू कडू यांनीही नितीन गडकरी यांच्या पंतप्रधानपदाबाबत भाष्य केले आहे.
गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता
बच्चू कडू बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यातील फरक सांगताना म्हटले की, मोदी पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती असून ते पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता, असा टोला लगावत महागाईने कळस गाठला आहे. मात्र त्यांना काही घेणे देणे नाही. ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी १०० रुपयांत गॅस वाटला, त्यावेळी ४०० रुपयांत सिलेंडर मिळत होते. आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तालुक्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला. संग्रामपुर तालुका आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात आरोग्य सुविधेचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. संपूर्ण तालुक्याकरिता १०८ क्रमांकाची एकच रुग्णवाहिका असल्याने वेळप्रसंगी उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. या गोष्टीचा विचार करून नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राजेश लहासे यांनी आपल्या स्वखर्चातून बच्चू कडू यांच्या आईच्या स्मृतिची आठवण म्हणून रुग्णवाहिका विकत घेऊन नागरिकांच्या सेवेत दाखल केली.