“शरद पवारांनी दोनदा चूक केली, परिणाम जनता भोगतेय”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:56 PM2024-04-23T16:56:17+5:302024-04-23T16:56:51+5:30

Bacchu Kadu News: रवी राणांचा युवा स्वाभीमान पक्ष फुटला आणि नवनीत राणा भाजपामध्ये गेल्या, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

bacchu kadu reaction over ncp sharad pawar statement about navneet rana in amravati lok sabha 2024 rally | “शरद पवारांनी दोनदा चूक केली, परिणाम जनता भोगतेय”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

“शरद पवारांनी दोनदा चूक केली, परिणाम जनता भोगतेय”; बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bacchu Kadu News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावतीतून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यापासून बच्चू कडू यांच्याकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच या उमेदवारीचा तीव्र शब्दांत विरोधही दर्शवला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य करताना बच्चू कडू यांनी शरद पवार यांनी दोनदा चूक केल्याचे म्हटले आहे. 

अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांची अमरावतीत जाहीर सभा पार झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा देऊ चूक केली. पाच वर्षांपूर्वी चूक झाली. पण आता ही चूक दुरुस्त करायची वेळ आली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर मीडियाशी बोलताना बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

शरद पवारांनी दोनदा चूक केली

शरद पवार यांनी एकदा नाही तर दोनदा चूक केली. एवढी मोठी चूक केली की, ती चूक संपूर्ण अमरावतीकरांना भोगावी लागत आहे. अशा चुका झाल्या तर अडचण होते. रवी राणा हे विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पाठिंबा घेऊनच निवडून आले. कारण पाठिंब्याशिवाय जमत नाही. आता रवी राणा यांचा पक्ष त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनीच फोडला. युवा स्वाभीमान पक्ष फुटला आणि नवनीत राणा भाजपामध्ये गेल्या, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

दरम्यान, सन २०१९ मध्ये  शरद पवार यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना मिळाला होता. नवनीत राणा यांना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच खासदार बनण्याची संधी मिळाली. शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या, त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांचीही इच्छा होती. म्हणून अजित पवार यांना भाजपसोबत पाठवले. अचानक सुप्रिया सुळे यांच्या हट्टापाई त्यांना थांबावे लागले. शरद पवार यांच्या मनात भाजप आहे, फक्त ओठावर विरोध आहे. - काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे शरद पवार बोलले असतील, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.
 

Web Title: bacchu kadu reaction over ncp sharad pawar statement about navneet rana in amravati lok sabha 2024 rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.