Bacchu Kadu: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं, पण तोवर डोक्यावरुन पाणी गेलंय- बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 09:15 AM2022-06-22T09:15:36+5:302022-06-22T09:16:01+5:30
Bacchu Kadu: शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पहाटेच सूरतहून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.
Bacchu Kadu: शिवसेनेतून एक मोठा गट फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणार मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार आज पहाटेच सूरतहून गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. सूरतमधील हॉटेलमधून निघण्याआधी बंडखोर आमदारांचा एक ग्रूप फोटो समोर आला आणि यात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार फुटले आहेत. या बंडखोर आमदारांसोबत 'प्रहार'चे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू देखील आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी संपूर्ण घटनाक्रम एबीपी माझा या वृत्तवाहिनीला फोनवरुन सांगितला आहे. यात बच्चू कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत फोनवरुन बोलणं झाल्याचं म्हटलं.
"मी स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांच्याशी बोलणं झालं. मी दोन्ही निवडणुकीला म्हणजेच राज्यसभा आणि विधान परिषदेलाही तुम्हाला मतदान केलं. पण अचानक हे वातावरण तयार झालं आणि मी आज इथं आहे असं त्यांना सांगितलं. एवढा सगळा प्रकार झाल्यामुळे मुख्यमंत्री नाराज होतेच. त्यांनी तुम्ही परत या असं आवाहन केलं. पण तोवर सगळं पाणी डोक्यावरुन गेलं आहे", असं बच्चू कडू म्हणाले.
सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत
आमदारांना मारहाण करुन डांबून ठेवण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता बच्चू कडू यांनी इथं असं अजिबात काहीच झालेलं नाही असं म्हटलं. "सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले.
समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल
एकनाथ शिंदे यांच्या गटाला असलेलं समर्थन हे ५० आमदारांपर्यंत पोहोचेल असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला. गुवाहाटीमध्ये सध्या शिवसेनेचे ३३ आमदार आणि अपक्ष ३ असे ३६ आमदार आहेत. यात शिवसेनेचे आणखी काही आमदार येणार आहेत. तसंच काँग्रेसचेही आमदार संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात हे समर्थन ५० आमदारांपर्यंत पोहोचेल, असं बच्चू कडू म्हणाले.