“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 05:25 PM2024-06-29T17:25:49+5:302024-06-29T17:34:04+5:30
Bacchu Kadu News: सामान्य माणसाला आधार देणाऱ्या योजनांचे काँग्रेसने मोठ्या मनाने स्वागत करायला हवे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
Bacchu Kadu News: राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडले. तर महायुतीतील नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. यातच बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आहे.
अर्थसंकल्पावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी पाच एकरची अट ठेवण्यात आली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. पाच एकर शेती असतानाही त्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही, त्यातून काहीही उत्पन्न निघत नाही. त्यामुळे पाच एकरची जी अट ठेवली आहे, ती रद्द करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
काँग्रेसला जमत नाही, म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे
काँग्रेसला अर्थसंकल्प जमला असता, तर शिवसेना भाजपा सत्तेत नसते. काँग्रेसला विकासाच्या गोष्टी जमत नाही. त्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. निवडणूक असताना सामान्य माणसाला आधार देणाऱ्या योजना येत असतील, तर काँग्रेसने मोठ्या मनाने त्याचे स्वागत करायला हवे. त्यांच्या राजकारणामुळे सामान्य माणसांचा फायदा होत असेल, तर त्याचा विरोध करण्याच कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले. ते टीव्ही९ शी बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगली योजना आहे, त्याचा महिलांना चांगला फायदा होईल, आम्ही या योजनेचे स्वागत करतो. तसेच शेतकऱ्यांची वर्गवारी करताना, नोकरी करणारा किंवा आयकर भरणारा शेतकरी अशी वर्गवारी करायला हवी. पाच एकर शेती आहे म्हणून शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, अशी अट घालणे चुकीचे आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.