Maharashtra Politics: बच्चू कडू यांनी सुरू केली विधानसभा निवडणुकीची तयारी; किती जागा लढणार ते स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:20 AM2023-02-16T11:20:25+5:302023-02-16T11:22:07+5:30
Maharashtra News: पुणे जिल्हा पोटनिवडणुकीत भाजप विजयी होणार, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यातील राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच काही पक्षांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केल्याचे सांगिले जात आहे. सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीसह राज्यातील विधानसभा निवडणुका होतील, असा कयास बांधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सांगितले असून, किती जागांवर उमेदवार देणार, याचा आकडा बच्चू कडू यांनी सांगितला आहे.
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप – शिंदे गटासोबत युती झाली तर योग्यच. अन्यथा १५ विधानसभा जागा लढवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. युतीसाठी आग्रह करु, पण, युती नाही तर स्वतंत्र लढणार असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच विस्तार केल्यावर भूकंप होईल, अशी स्थिती नाही. विस्तार झाल्यावर कुणी बाहेर जाणार नाही. उलट इकडेच येतील. मंत्री मंडळ विस्ताराचा विषय गंमतीचा झाला आहे. २० मंत्री करायचे आहे तर ५० लोक रांगेत आहे. आता विस्तार आहे म्हणून अर्धे लोक मुंबईतच असतात. असेच अनेकांच्या डोक्यात आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
पवारांनी हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय अजितदादा शपथ घ्यायला गेले का?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर बोलताना, शरद पवार यांना त्यांच्याच परिवारातील व्यक्ती पहाटेचा शपथ घ्यायला जातो, हे माहिती नसेल का? शरद पवार यांना माहिती असेल, त्यांनी हिरवा झेंडा दाखवला असेल म्हणून अजित दादा शपथ घ्यायला गेले असतील. पवार साहेब माहिती नव्हते तर मग बंड करुनही अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद का दिले, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
दरम्यान, नाना पटोले यांनी बंड केले. काँग्रेस सोडून भाजप आणि पुन्हा काँग्रेस आता त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाले. पुणे जिल्हा पोटनिवडणुकीत भाजप विजयी होणार आहे. आमचा पाठिंबा आहे. भाजप निवडून येईल अशी खेळी केली आहे, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"