“सचिनने १५ दिवसात ‘त्या’ जाहिरातीतून माघार घ्यावी, अन्यथा घरासमोर आंदोलन करू”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:36 AM2023-08-11T11:36:29+5:302023-08-11T11:38:44+5:30
बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असे सांगितले जात आहे.
Bacchu Kadu And Sachin Tendulkar: गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी, अन्यथा घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. यासाठी बच्चू कडू यांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम सचिनला दिला आहे.
सचिन तेंडूलकरच्या घरी जाऊन प्रहार टाइप आंदोलन करणार आहोत. भारतरत्न असलेल्या सचिन तेंडूलकरने यावर स्पष्टिकरण दिले पाहिजे. या भारताचा तो अभिमान आहे. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी. भारतीयांची ऑनलाइन गेममधून मुक्तता व्हावी म्हणून आम्ही सचिन तेंडूलकरला नारळ पाणी देऊ. पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. गेममध्ये अधिक पैसे गुंतवू नका, अशी जाहिरात करायची आणि दुसरीकडे गेमची जाहिरात करायची, असे धंदे सुरु आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दिले होते पत्र
बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. सचिन तेंडुलकर प्रसिद्ध क्रिकेटर असून, भारतात लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत चाहते आहेत. त्यामुळे ते करीत असलेल्या जाहीरातींचा परिणाम लहान थोर सर्व स्तरापर्यंत होतो व या जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील जनता बळी पडत असून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत, असे बच्चू कडू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकरने ऑनलाइन गेमची जाहिरात केली आहे. या प्रकरणी सचिन तेंडुलकर यांना राज्य सरकारने नोटीस पाठवून जाब विचारला पाहिजे, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली होती.