शिवसेनेच्या सामर्थ्यात आणखी वाढ; बच्चू कडूंच्या पाठिंब्यानं भाजपावर 'प्रहार'?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 09:12 AM2019-10-27T09:12:11+5:302019-10-27T09:22:44+5:30
बच्चू कडूंच्या प्रहारचा शिवसेनेला पाठिंबा
मुंबई: महायुतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरुन दबावाचं राजकारण सुरू असताना शिवसेनेला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रहारचे आमदार राजकुमार पटेलदेखील उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकदीनं शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली. त्यामुळे दबावाच्या राजकारणात शिवसेनेचं सामर्थ्य वाढलं आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कडूंनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामं रोजगार हमी योजनेतून करणं, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर, मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कडूंनी सांगितलं.
Shiv Sena gets support of 2 more MLAs of Prahar Janshakti Party. Bachchu Kadu of Achalpur assembly constituency and Rajkumar Patel of Melghat assembly constituency met Shiv Sena Chief Uddhav Thackeray last night and extended their support to him. #Maharashtrapic.twitter.com/VaWe4jLQ6T
— ANI (@ANI) October 27, 2019
सर्वसामान्य नागरिकांच्या, आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर प्रहार आणि शिवसेनेची वैचारिक भूमिका समान असल्यानं त्यांना शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कडू म्हणाले. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं पत्रदेखील यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू अचलपूरचं, तर राजकुमार पटेल मेळघाटचं प्रतिनिधीत्व करतात.