पालिकेचा लाचखोर कनिष्ठ अभियंता जेरबंद
By admin | Published: February 5, 2017 01:43 AM2017-02-05T01:43:01+5:302017-02-05T01:43:01+5:30
अनधिकृत बांधकामाला निष्कासनाची नोटीस न देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना, मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
मुंबई : अनधिकृत बांधकामाला निष्कासनाची नोटीस न देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना, मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी शनिवारी अटक केली. प्रदीप दिलीप जाधव (२५) असे लाचखोराचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी सांताक्रुझ पूर्वेकडील एच पूर्व वॉर्ड कार्यालयाच्या हद्दीत एका झोपड्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. याच परिसरात राहणाऱ्या एका स्थानिकाने या विरोधात पालिकेकडे तक्रार दिली. तक्रारीवरून बांधकामास निष्कासनाची नोटीस न धाडण्यासाठी, पालिकेच्या एच पूर्व वॉर्ड कार्यालयातील इमारत व कारखाने विभागाचा लाचखोर कनिष्ठ आयुक्त जाधव याने, कंत्राटदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती.
कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांताक्रुझमधील महाराजा अग्रसेन चौक परिसरात शनिवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचखोर जाधव याने लाचेच्या रकमेचा १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)