‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ने जपले सामाजिक भान

By admin | Published: October 22, 2016 08:40 PM2016-10-22T20:40:34+5:302016-10-22T20:40:34+5:30

‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने सामाजिक भान जपत साहेब अली शेख या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लाख रुपयांची आर्थिक मदत केली

'Bachchanweed Kolhapuri' has a social awareness | ‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ने जपले सामाजिक भान

‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ने जपले सामाजिक भान

Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 22 - सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी दोन वर्षांपूर्वी एकत्र येत ‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची सुरुवात केली.  परंतु फक्त मनोरंजन इथपर्यंतच न थांबता या ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक भान जपत साहेब अली शेख या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लाख रुपयांची आर्थिक मदत केली. छत्रपती शाहू कॉलेज येथे झालेल्या समारंभात पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या हस्ते ही मदत साहेब अलीस देण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने,सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव सुंदर देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार उपस्थित होते.
साहेब अलीचे कुटुंबीय मूळचे उत्तरप्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील. त्याचे वडील सखावत अली  फॉल सिलिंगचे काम करतात. उदरनिर्वाहासाठी सोळा वर्षांपूर्वी ते कोल्हापुरात वास्तव्यास आले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने सातजणांचे कुटुंब असलेल्या सदस्यांची रोजीरोटी कशीबशी चालायची. तरीही जिद्दीने साहेब अलीने जिद्दीने शिक्षण घेत दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले. म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूलमध्ये शिकत असतानाच लग्न समारंभात वाढपी म्हणून काम करणे, वडिलांना त्यांच्या कामात मदत करणे अशी कामे तो करीत असायचा. सध्या तो छत्रपती शाहू कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत असून त्यास मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे आहे.
बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपतर्फे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बच्चन महोत्सव’ घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत साहेब अलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून लाख रुपयांचा धनादेश शनिवारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान, मुस्लिम बोर्डिंग हाऊसचे चेअरमन गणी आजरेकर यांचा, मराठा क्रांती मोर्चात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी नागरिकांनी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर  सामाजिक सलोख्यासाठी करावा, असे आवाहन केले. एकमेकांना मदत करण्याची संस्कृती व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून जपल्याबद्दल आमदार पाटील यांनी ‘बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुप’चे कौतुक केले. ग्रुपचे अ‍ॅडमिन सुधर्म वाझे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ग्रुपचे इंद्रजित घोरपडे, प्राचार्य किरण पाटील, देवेंद्र रासकर, प्रकाश मेहता, अ‍ॅड. दिलशाद मुजावर, आदी सदस्य उपस्थित होते. 
 

Web Title: 'Bachchanweed Kolhapuri' has a social awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.