लाचखोरास चार वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: July 8, 2015 01:51 AM2015-07-08T01:51:38+5:302015-07-08T01:51:38+5:30
नाशिकच्या वेतन पडताळणी पथकातील सहायक अधीक्षक नंदकुमार बैरागी या लाचखोर अधिकाऱ्यास नगरच्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघुले यांनी मंगळवारी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
अहमदनगर : नाशिकच्या वेतन पडताळणी पथकातील सहायक अधीक्षक नंदकुमार बैरागी या लाचखोर अधिकाऱ्यास नगरच्या तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.व्ही. सावंत-वाघुले यांनी मंगळवारी चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. लाचखोर अधिकाऱ्यास तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचा अलीकडच्या काळातील हा पहिलाच निकाल आहे.
माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांचे वेतन निश्चित करण्यासाठी वेतन पडताळणी समिती नावाने स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. नाशिक येथे मुख्य कार्यालय असून, समितीचे एक पथक नगरमध्ये आहे. याच वेतन पडताळणी पथकाचे (लेखा व कोषागरे) सहायक अधीक्षक नंदकुमार बैरागी याने ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना १४ मार्च २०१३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर येथे त्यास अटक केली होती. दत्तात्रय संभाजी राऊत या तक्रारदारास त्यांच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीच्या त्रुटींची पूर्तता करून वेतननिश्चितीची पडताळणी करण्यासाठी बैरागी याने पैशांची मागणी केली होती.
बैरागीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील गोरख मुसळे यांनी काम पाहिले.
या खटल्यामध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले. अखेर आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. (प्रतिनिधी)
अजामीनपात्र शिक्षा
नगरच्या न्यायालयात आतापर्यंत लाचखोर अधिकाऱ्यांना तीन किंवा तीनपेक्षा कमी वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. तीन किंवा त्यापेक्षा कमी वर्षांच्या शिक्षेतील आरोपीस जामिनाचे अधिकार जिल्हा न्यायालयाला आहेत. मात्र तीनपेक्षा जास्त वर्षे शिक्षा झाल्यास जामीन देण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला असल्याने आरोपींना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. या प्रक्रियेला विलंब होत असल्याने आरोपींना कोठडीत दिवस काढावे लागतात.