‘बकचोच तुतारी’चा रशिया-मुंबई-रशिया प्रवास
By admin | Published: May 11, 2017 01:44 AM2017-05-11T01:44:42+5:302017-05-11T01:44:42+5:30
स्थलांतरित पक्ष्यांंसाठी मुंबईचे हवामान अनुकूल असून, या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. स्थलांतरित
अक्षय चोरगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थलांतरित पक्ष्यांंसाठी मुंबईचे हवामान अनुकूल असून, या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. स्थलांतरित पक्ष्यांमधील रशियातून येथे दाखल होत असलेला ‘बकचोच तुतारी’ हा पक्षी सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत असून, बॉम्बे नॅचरल
हिस्ट्री सोसायटीच्या बर्ड रिंगिग संशोधनातील हा एक महत्त्वपूर्ण पक्षी आहे. या पक्ष्याची नोंद शिवडी आणि नवी मुंबईच्या खाडी परिसरात झाली आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नव्वद वर्षे बर्ड रिंगिगद्वारे पक्ष्यांच्या स्थलांतरावर संशोधन होत आहे. या संशोधनात बकचोच तुतारी (- लांब चोच असलेला पक्षी) हा रशियात आढळणारा पक्षी दरवर्षी रशिया-मुंबई-रशिया असा प्रवास करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
डिसेंबर २०१४ ते फेबु्रवारी २०१५ या काळात मुंबईत अनेक ठिकाणी बीएनएचएसने बर्ड रिगिंग केले. त्या काळात बर्ड रिंगिंग केलेले पक्षी हिवाळा संपल्यानंतर, मायदेशी परतले. त्यातील बकचोच तुतारी या प्रजातीचे पक्षी रशियाला परतले, त्यापैकी काही पक्षी पक्षीतज्ज्ञांना मुंबईतील शिवडीची खाडी आणि नवी मुंबई परिसरात पाहायला मिळाले.
असा असतो बकचोच तुतारी -
हिवाळ्यात मुंबईत स्थलांतरित झालेले पक्षी उन्हाळ्यात मायदेशी परतू लागले आहेत. बकचोच तुतारी पक्ष्यांनीसुद्धा रशियाची वाट धरली आहे. बकचोच तुतारीला इंग्रजीमध्ये ‘कर्ल्यु सँडपायपर’ असे म्हटले जाते.
त्याचे शास्त्रीय नाव ‘कॅलिड्रीस फेरुगिनिआ’ असे आहे. १९ ते २१ सेंमी उंच आणि ७.७ ते ८.३ सेंमी लांब असणाऱ्या हा पक्षी गडद राखाडी रंगाचा असतो.
तसेच वरच्या भागात विटकरी लाल रंगाची पिसे असतात. खाडीजवळ चिखल आणि दलदलीच्या प्रदेशात हे पक्षी किडे टिपतात. त्यांचे मुख्य खाद्य किडेच आहेत.