तर उद्धव ठाकरेंच्या सुद्धा विरोधात जाऊ: बच्चू कडू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 02:34 PM2020-01-15T14:34:36+5:302020-01-15T14:38:34+5:30
फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही
मुंबई : मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून, त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केलेचं पाहिजे. मात्र ज्या दिवशी उद्धव ठाकरे चूक करतील त्यादिवशी त्यांच्यासुद्धा विरोधात जाऊ, असा इशारा प्रहार संघटनेचे नेते आणि राज्य जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. एका डीजीटल मिडियावर मुलाखत देताना ते बोलत होते.
आमच्या सरकारने 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा फायदा 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. तर मागच्या फडणवीस सरकारने केलेली दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालाच नाही. तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा 25 हजार मिळाले नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी यावेळी केला.
तर उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवले. विशेष म्हणजे इतर पक्ष निवडणुकीच्या तोंडावर अशा घोषणा करतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करायले पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यंमत्री आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलत आहे असे नाहीत. ज्या दिवशी उद्धव ठाकरे चुकतील त्यावेळी त्यांचा विरोधात सुद्धा जाऊ, असेही बच्चू कडून यावेळी म्हणाले. तसंच माझं मंत्री पद गेलं तरी चालेल पण मी माझी भूमिका कधीच बदलणार नसल्याचेही बच्चू कडू म्हणाले.