Bachchu Kadu : "मी 'बच्चू' आहे, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 04:25 PM2022-08-06T16:25:52+5:302022-08-06T16:37:16+5:30
Bachchu Kadu : मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत प्रश्न विचारला असता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात नवे सरकार अस्तित्वात येऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तसेच, मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून सुद्धा नव्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. याच दरम्यान आता मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत प्रश्न विचारला असता आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी 'बच्चू' आहे, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही" असं म्हटलं आहे.
"मी बच्चू आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही. माझं नाव मुद्दाम माझ्या आईने बच्चू कडू ठेवलं. मी मंत्री जरी असलो तरी आम्ही सेवक आहोत आणि सेवा करणं माझं काम आहे. आम्ही हे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावणार आहोत" असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शनिवारी एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी शासकीय कामांच्या बैठकांसाठी मी दिल्लीत आलो आहे. दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक आयोजीत केली आहे. त्या बैठकील मी उपस्थित राहणार आहे. तसेच, उद्या निती आयोगाची बैठक होणार आहे. या दोन्ही बैठकांसाठी मी दिल्लीत आलो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
याचबरोबर, प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारला. यावेळी, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही. खात्यांची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबवले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.